विशेष प्रतिनिधी
नाशिक : मागच्या दोन दिवसापासून सांगत आहे अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारू नका, अपशब्द वापरु नका. आपल्या भावना शांततेत व्यक्त करा, असे आवाहन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. संतप्त झालेल्या भुजबळ समर्थकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारी आंदोलन केले.
राज्य मंत्री मंडळात समावेश झाला नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिक येथे आले. पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर आगपाखड केली. भुजबळ म्हणाले, तुम्ही उठ म्हणाले की उठ आणि बस म्हणाले की बस हे ऐकणारा छगन भुजबळ मनुष्य नाही. आलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या वेदना आणि दुःख मांडले. मी पण त्यांना जे घडले आहे ते सांगितलं. मी माझ्या मतदार संघात आज जातोय . उद्या पुन्हा एक समता परिषेदेची बैठक आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे. सुसंस्कृत पणे आपल्या भावना व्यक्त करा असे सांगितले. जोडे मारो आंदोलन करू नका असे आवाहन मी केले आहे.
भुजबळ म्हणाले, प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या प्रकारे अवहेलना केली त्याचा आहे. पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात. आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील मला वरुन निवडणूक लढण्यासाठी सांगितले होते. एक महिना झाला तरी माझं नाव जाहीर झाले नाही. माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवट पर्यंत आग्रह धरला होता.
मी 40 वर्षांपासून मी इथे आहे म्हणून मला राज्यसभा द्या अशी माझी मागणी होती, असे सांगून भुजबळ म्हणाले, मी लढलो. जिंकून आलो आणि आता मला जाण्यासाठी सांगत आहेत. प्रफुल पटेल हे समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्याशी बोलत आहेत. कार्यकर्त्यांना आवाहन करताना भुजबळ म्हणाले जे लोक अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारतील किंवा अपशब्द वापरतील ते समता परिषदेचे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी योग्य वेळ आल्यावर छगन भुजबळ यांना भेटू असे म्हटले होते. यावर उत्तर टाळत भुजबळ म्हणाले, ठीक आहे बघू.