विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनस्थळी आझाद मैदानात असलेल्या आंदोलकांसाठी मुंबई महापालिकेने मुलभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत. आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरातील फूट स्टॉल्स, हॉटेल महापालिकेच्या आदेशाने बंद आहेत. शौचालयांमध्ये पाणी नाही, अशी तक्रार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने सर्व मुलभूत सोयी सुविधांची व्यवस्था केली असल्याचा दावा केला आहे. Mumbai Municipal Corporation
पाणी तोडण्याचा प्रश्नच नाही. हॉटेल सरकारी नाहीत. ती खासगी मालकीची आहेत. त्यामुळे ते सुरु ठेवायचे की बंद ठेवायचे हा त्यांचा अधिकार आहे. शासकीय अधिकारी त्यांच्याकडे गेले त्यांनी हॉटेल बंद करायला सांगितले असे एकही उदाहरण नाही, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिल्या या सर्व सुविधा
आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी काल (29 व 30 ऑगस्ट) आज बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध नागरी सेवा सुविधा दिल्या असल्याचे म्हटले आहे. सततच्या पावसामुळे, आझाद मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्गावर 2 ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे 11 टँकर्स उपलब्ध केले आहेत. अतिरिक्त टँकर्स मागविले आहेत. आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात केले असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. त्याचा लाभ आंदोलक घेत असल्याचे मुंबई महापालिककडून सांगण्यात आले आहे. 4 वैद्यकीय पथक आणि 2 रुग्णवाहिका मैदान परिसरात 24 तास कार्यरत आहेत. याशिवाय 108 रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध आहे.
आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
मैदानात आतील बाजूस एकूण 29 शौचकूप असणारे शौचालय विनामूल्य उपलब्ध करुन दिले आहेत. आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी 10 शौचकुपे असलेली3 फिरती शौचालये उपलब्ध आहेत.
मेट्रो साइट शेजारी 12 फिरती (पोर्टेबल) शौचालये तसेच अतिरिक्त शौचालयांची सोय करण्यात आली आहे. तसेच, फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून 250 शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरवली आहेत.
मुंबई महापालिकेने इतरही अनेक कामे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली असल्याची माहिती दिली आहे, त्यामध्ये पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र दोन पथके कार्यरत आहेत.
इतर आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख. नजीकच्या इतर कार्यालयांमधून अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही, हेही स्पष्ट केले आहे.
All civic facilities for protesters, Mumbai Municipal Corporation rejects Jarange’s allegations
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा