विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना शिंदे गटातील किमान 35 आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना या वृत्तपत्रातून केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काहीच आलबेस नसल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि काही स्थानिक प्रमुख नेते आता भाजपाने आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याच विरोधात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार घालत आपली नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार सुद्ध केली. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे की, पुढील विधानसभेला भाजपा शिंदेंशिवाय निवडणुका लढणार हे नक्की. भाजपाने एक ‘पक्ष’ निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपानेच सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपामध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे. भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुसऱ्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदे गटावरच घाव घालणे सुरू आहे. शिंदे यांचा पक्ष म्हणजे बुडबुडे आहेत. अमित शहा यांनी निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाच्या संगनमताने शिंदे यांना शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह दिले. शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे. शिंदे हे ठेकेदार सेना चालवतात. त्यामुळे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत तसे शिंदे यांना लोक चिकटलेले आहेत.
भाजपाच्या रवींद्र चव्हाणांनी शिंदेंसमोर मोठी गुळाची ढेप ठेवली. शिंदे यांचे मुंगळे हे भाजपाच्या ढेपेवर चढले. शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपाला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाला आहे. ‘‘रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली’’ या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वतःच फुटले, त्यांनी माणसे फोडण्यावर चिंता व्यक्त करावी, हा मोठाच विनोद आहे. महाराष्ट्रात सत्तापक्षांतील ‘नाराजी’ नाट्य सुरूच राहील. या ‘नाराजी’ नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आणि हा अंक संपवणारी घंटा वाजत आहे. नाराज शिंदे यांना भाजपा कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही. ‘नाराजी’चे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे!, असा दावाही सामनातून केला आहे.
At least 35 MLAs from Shiv Sena Shinde faction will join BJP, claims Thackeray faction
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश




















