विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये छगन भुजबळ समर्थकांकडून भुजबळ फार्मबाहेर लागलेले होर्डिंग चर्चेत आहे. साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत असा यावर उल्लेख असून या होर्डिंगवरून पक्षाच्या चिन्हासह अजित पवारांचा फोटो गायब आहे.
भुजबळ नाशिक आणि आपला बालेकिल्ला असलेल्या येवल्यात पदाधिकारी आणि ओबीसी समर्थकांसोबत बैठका घेत चर्चा करणार असून भुजबळांच्या पुढील भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबरच्या रविवारी नागपुरातील राजभवनात पार पडला. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्यात आली.पण चर्चा आहे ती मंत्रिपद डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांची. कारण, अजितदादांपेक्षाही जास्तीचा राजकीय प्रवास अन् अनुभव असलेले नेते म्हणजे छगन भुजबळ. या भुजबळांना अगदी अजितदादाही पहिल्या फळीतले नेते मानतात. तरीही त्यांना डावलण्यात आले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते भुजबळांमधला संघर्ष संपूर्ण राज्यानं पाहिला आहे. त्याला सुरुवात झाली ती म्हणजे अंतरवाली सराटी गावात पोलीस लाठीचार्जवरुन भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावरुन. त्यावेळी भुजबळांनी थेट जरांगे अन् मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप केले होते अन् मुख्यमंत्री शिंदेंकडून जरांगेंना दिलेल्या वर्तणुकीवरही नाराजी बोलून दाखवली होती. याउलट जरांगे पाटलांना मात्र संभाजीराजे, शाहू महाराज छत्रपतींपासून पवार-ठाकरे, आंबेडकरांपर्यंत सर्वांनीच पाठिंबा दिला होता.
त्यामुळे राज्यातील मराठा समाजही जरांगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसून आला. त्याचा परिणाम मागील काळात महायुतीच्या सरकारची बदनामी झाली अन् सरकारवर दबाव वाढत गेला. कॅबिनेट मंत्रिपदी असूनही भुजबळांनी ओबीसींसाठी एल्गार सभा घेतल्या. सत्तेत असून, कॅबिनेट मंत्री असूनही भुजबळांनी एका विशिष्ट समाजासाठी भूमिका घेतली. जालन्यातील एल्गार सभेत भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापताना दिसला.