विशेष प्रतिनिधी
मुंबई: Uddhav Thackeray भाजप व संघ मुंबईत भाषिक प्रांतवादाचे विष पसरवत आहेत. पण त्याचे खापर आपल्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. काल-परवा एक दुर्दैवी घटना घडली. ती घडायला नको होती. भाषेवरून कुणाचे खून करा, कुणाला मारा अशी आपली मागणी नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहेUddhav Thackeray
मुंबई व उपनगरांतील भाजप व शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा आज शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत दररोज प्रवेश होत आहेत. मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जात आहे. पण ही केवळ गर्दी नाही, तर लढणाऱ्या शिवसैनिकांची ही संघटना व हे सैन्य आहे. आज शिवसेनेत अनेकजण परत आलेत. भाजप व गद्दार गट किती ढोंगी आहे हे हळूहळू सर्वांच्या लक्षात येत आहे. पण ही लढाई सोपी नाही. तुम्ही एका जोशात आहात, जोश तर पाहिजे, पण त्याच बरोबरीने डोळे उघडे ठेवून सगळीकडे पाहा.Uddhav Thackeray
ते पुढे म्हणाले, भाजप हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले, त्याच पद्धतीने ते आता घरेही फोडत आहेत. त्यांचा हिंदुत्त्वाचा फुगाही आता फुटला आहे. पालघरमध्ये आपण सत्तेत असताना जे साधूंचे हत्याकांड झाले, त्यातील आरोपींना भाजपने दोन दिवसांपूर्वी आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर बोभाटा झाला. भाजपला वाटले होते की, आपले हे पाप लपून जाईल. पण त्यांचे पाप लपले नाही. चव्हाट्यावर आले. त्यानंतर त्यांनी घाईगडबडीने त्या आरोपीच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. म्हणजेच काय की त्यांचे हिंदुत्त्वाचे ढोंग फुटले आहे.
उद्धव ठाकरे यावेळी अर्णव खैरे प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले, आता भाजप व संघ भाषिक प्रांतवाद पेटवत आहेत. काल-परवा एक दुर्दैवी घटना घडली. ती घडायला नको होती. भाषेवरून कुणाचे खून करा, कुणाला मारा अशी आपली मागणी नाही. पण कुणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये. हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला कुठून? मागाठाणे येथील एकाने (शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे) मराठी माझी आई आहे आणि माझी आई मेली तरी चालेल असे विधान केले होते. हे लोक अशा पद्धतीने जनतेत राग पसरवत आहेत. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची.
संघाचे एक पदाधिकारी भय्याजी जोशी यांनी घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की, तेथील मातृभाषा गुजराती आहे. मग हे विष जे आहे ते भाजप व संघ पसरवत असून, त्याचे खापर आपल्यावर फोडले जात आहे. तोडा, फोडा व राज्य करा हे त्यांचे धोरण आहे. त्यापासून आपल्याला सावध राहायचे आहे. आपल्याला आपल्या भूमिपूत्रांना सांभाळायचे आहे. हे काम केवळ आपली शिवसेनाच करू शकते याचे मला समाधान वाटते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्याला संघर्ष करायचाच आहे. आपण हिंमतीने लढणार. मनगटात हिंमत असते तेव्हा विजय दूर नसतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. मुंबई महापालिका असो, कल्याण डोंबवली महापालिका असो त्यावर आपण आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. अर्णव खैरे मृत्यू प्रकरणाचं राजकारण करणाऱ्या अमित साटमांनी लक्षात घ्यावं, महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी किंवा हिंदू विरुद्ध मुस्लिम या जातीय आणि धार्मिक दंगली उसळवून त्यात जे बळी गेले त्याला कारण असलेल्या भाजपावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवण्याची हिंमत आधी ठेवा… एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण करण्यापेक्षा लोकाभिमुख प्रश्नांवर बोलायला शिका.. आपल्याला मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पद दिले त्याला साजेस काम करा, असे त्या म्हणाल्यात.
BJP and RSS spreading the poison of linguistic regionalism in Mumbai, alleges Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश




















