विशेष प्रतिनिधी
Mumbai News : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने वेळेआधीच जोरदार हजेरी लावली असून, रविवारी आणि सोमवारी राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. विशेषतः मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, रायगड आणि बारामती या भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Heavy rains in Maharashtra
मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल २९५ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस गेल्या १०७ वर्षांतील मे महिन्यातील सर्वाधिक असल्याचा हवामान विभागाचा दावा आहे. त्यामुळे शहरातील हिंदमाता, परळ, सायन, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, बोरिवली आणि मलाड अशा सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.
मुंबई मेट्रोच्या नव्याने सुरू झालेल्या लाईन-३ मधील वर्ली आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांत पाणी शिरल्यामुळे मेट्रो सेवा बंद करण्यात आली. त्याचबरोबर केईएम रुग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता विभागातही पाणी शिरले. परिणामी रुग्णसेवांवर मोठा परिणाम झाला. मुंबई विमानतळावर काही उड्डाणे विलंबित झाली असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाशी सातत्याने संपर्कात राहून बचावकार्य गतिमान ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. इतर जिल्ह्यांतील स्थितीही गंभीरच आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर भागांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बारामतीत १०४ मिमी पावसाची नोंद झाली असून, २५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. ७० ते ८० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इंदापूरमध्ये २ जणांना पुरातून वाचवण्यात आले.
फलटणमध्ये तब्बल १६३ मिमी पाऊस झाला असून, ३० नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना NDRF टीमने सुखरूप बाहेर काढून निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात ६ नागरिकांना, तर पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पुरात अडकलेल्या ३ जणांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात महाडजवळ विजेच्या धक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अंदाज पुढील २४ तासांसाठीही धोक्याचा आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि भूस्खलनाचा धोका असल्याने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि आरोग्य विभाग सतर्क असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोबाईल सेवा आणि वीज पुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला असला, तरी तो हळूहळू पूर्ववत केला जात आहे. Heavy rains in Maharashtra
Heavy rains in Maharashtra Record rainfall in Mumbai, flood-like situation in many districts
महत्वाच्या बातम्या