विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील दादर कबुतरखाना बंद करण्याचा झाल्याने जैन समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. आरोग्याच्या कारणास्तव कबुतरखाना बंद करण्यावर मुंबई उच्च न्यायालय ठाम राहिल्याने आता याबाबत कायदेशीर आणि वैद्यकीय बाबींचा अभ्यास करण्याचा निर्णय जैन महासंघाने घेतला आहे. त्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी जैन महासंघाची 13 ऑगस्ट रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली होती.
मुंबई महापालिकेने कबुतरांना कुठलेही खाद्य टाकण्यास मनाई करत कबुतरखान्यावर ताडपत्री टाकली होती. मात्र, जैन समाजाने आक्रमक होत 6 ऑगस्ट रोजी चाकू-सुऱ्यांनी ताडपत्री काढून टाकली होती. त्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. जी. एस. कुलकर्णी आणि न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने कबुतरांना धान्य टाकण्यावरील बंदी कायम ठेवली. या संदर्भात झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्यास सांगितले. या समितीतील तज्ज्ञांच्या अहवालानंतर न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे.
अशा वेळी या समितीकडे जैन समाजाला त्यांचे म्हणणे मांडता यावे, यासाठी जैन महासंघाने स्वत: कायदेतज्ज्ञ, वैद्यकीय जाणकारांची तसेच जैन समाजातील काही प्रतिष्ठित मंडळींची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
जैन महासंघाची अभ्यास समिती कबुतरखान्यांसंदर्भात कायदेशीर बाब तसेच वैद्यकीय बाजूंचा तसेच पर्यावरणाचाही अभ्यास करणार आहे. लोकांच्या आजारांच्या रिपोर्टचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर अहवाल न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीला सादर करेल. ही समिती 20 सदस्यांची असेल, असे जैन महासंघाच्या बैठकीत ठरले. या बैठकीसाठी मुंबईतील प्रतिनिधींसह 12 राज्यांतील जैन महासंघाचे प्रमुख उपस्थित होते.
कबुतरांमुळे कोणते आजार होतात, त्यांचे स्वरुप कसे आहे, परदेशातील कबुतरखान्यांसंदर्भात कोणती काळजी घेतली जाते, कबुतरखाने इतरत्र हलवावे लागले तर कोणती उपाययोजना करावी लागेल, मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही आणि कबुतरांचा जीव जाणार नाही, याची कशी सांगड घालता येईल आदी अनेक बाबींचा अभ्यास जैन समाजाची समिती करणार आहे, असे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
Jain committee to study pigeons and human health, will also examine legal matters
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला