विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंबई रस्त्यावरून जाताना खडकी पोलीस ठाण्यालगतच्या लोहमार्गाखालील भुयारी मार्गाची रुंदीकरण करण्याबाबत सोमवारी सकारात्मक चर्चा झाली. येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सध्यापेक्षा दुप्पट मार्ग करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात नवीन भुयारी मार्ग बांधून पूर्ण करण्याचे ठरले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ही बैठक रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया, रेल्वे आणि पुणे महापालिकेचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
शिरोळे म्हणाले, वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होत आहे. औंध, बोपोडी येथून राहणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने हा भुयारी मार्ग महत्त्वाचा आहे. त्याबाबत गेले वर्षभर चर्चा सुरू आहे. या चर्चेतून मार्ग निघाला असून अंतिम आराखडा लवकर तयार करावा. त्याला मान्यता घेऊन तातडीने भुयारी मार्गाची बांधकाम करावे.
रेल्वे, महापालिका यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर रेल्वे विभागीय व्यवस्थापक वर्मा म्हणाले, दोन्ही विभागाच्या अभियंत्यांनी एकत्र बसून 15 फेब्रुवारीपर्यंत या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करावा. त्याला योग्य ती मान्यता घेऊन त्यानंतर सहा महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्यात यावा.
शिरोळे म्हणाले, हा प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास या परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल. वाहनचालकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल. लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून आगामी वर्षात नागरिकांना त्याचा वापर करता येईल या दृष्टीने सर्व विभागांनी काम करावे.
पुणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत गायकवाड, अभिजीत आंबेकर, उप अभियंता हेमंत जगताप, रेल्वेचे या प्रकल्पाचे सल्लागार सुधीर पाटील यांच्यासह रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Khadki railway subway will be widened within a year, Siddharth Shirole
महत्वाच्या बातम्या