विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही”, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत एका मराठी भाषिक कुटुंबाला मराठी असणाऱ्यावरुन हिणवत जबर मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याल घटनेवर प्रचंड वातावरण तापल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर या घटनेवर भूमिका मांडली आहे.
“सस्नेह जय महाराष्ट्र, कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही”, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
“कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे. आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो”, असं राज ठाकरे म्हणाले.