विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या नात्यातील नवीन अध्यायाला आज सुरुवात झाली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे बुधवारी सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते.
राज ठाकरे यांच्या घरी परंपरेप्रमाणे दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. यावर्षी राज ठाकरे यांनी स्वतः फोन करून उद्धव ठाकरे यांना गणपती दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आणि आपल्या कुटुंबासह गणेशदर्शनाला शिवतीर्थ येथे दाखल झाले. दर्शनानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे दुपारी राज ठाकरे यांच्या घरी जेवणासाठी थांबणार आहेत, असेही सांगण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय आणि वैयक्तिक दुरावा निर्माण झाला होता. राज ठाकरे हे दादरच्या शिवाजी पार्कमधील कृष्णकुंज या वास्तूमध्ये राहत असत. मात्र, तीन वर्षांपूर्वी त्यांनी नवीन उभारण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या वास्तूमध्ये वास्तव्य सुरू केले. अनेक राजकीय नेते येथे भेट देऊन गेले असले तरी उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत कधीही शिवतीर्थवर पाऊल ठेवले नव्हते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेली ही पहिलीच भेट आहे.
२७ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. अनेक वर्षांनंतर त्यांनी मातोश्रीला भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधीही गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या सततच्या संपर्कामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा आता हळूहळू मिटत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता, ठाकरे गट आणि मनसे युती होण्याची शक्यता वाढली आहे. जर हे मनोमिलन राजकीय पातळीवर युतीत रुपांतरित झाले तर मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होऊ शकते. दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद भाजप आणि शिंदे गटासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
आजच्या भेटीत फक्त औपचारिक गणपती दर्शनच होणार की यामागे आणखी काही महत्त्वाच्या चर्चाही होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह राज ठाकरे यांच्या आमंत्रणाला प्रतिसाद दिला यालाच मोठे राजकीय महत्त्व दिले जात आहे.
Thackeray Brothers Reunite During Ganeshotsav, Shivtirth Meeting Sparks Political Significance
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा