Uddhav Thackeray : अजितदादा पवार यांच्या शोकसभेत उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray ज्यांनी त्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत, आज त्यांच्यासोबत ते सत्तेत आहेत. कुणाला किती बदनाम करायचे, आयुष्यातून किती उठवायचे याची मर्यादा पाळली पाहिजे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजितदादा पवार यांच्या शोकसभेत भाजपवर टीका केली.Uddhav Thackeray

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दु:खद निधनाबाबत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.Uddhav Thackeray



उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांची आठवण नेहमीच येत राहील. पण अलीकडच्या काळात अजित पवारांनी एक विधान केले होते. ते म्हणाले होते की, ज्यांनी त्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत, आज त्यांच्यासोबत ते सत्तेत आहेत. पण एखादी व्यक्ती जिवंत असताना आपण त्यांचा जीव नकोसा करतो. त्याला एवढे बदनाम करतो की त्याला जीव नकोसा होतो. मग तोच आपल्यातून गेल्यानंतर तो आपलासा वाटू लागतो. मला असे वाटते की, या निमित्ताने आपण एक मर्यादा पाळली पाहिजे. कुणाला किती बदनाम करायचे, आयुष्यातून किती उठवायचे, कारण तो ही माणूसच आहे. अजित पवारांचे एक वैशिष्ट म्हणजे ते या आरोपामुळे कधी खचले नाही. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता. दुर्दैवाने त्यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या जागी एखादा दुसरा खचलेला माणूस असता तर त्याने खरोखर जीव दिला असता. कारण हे राजकारण किंवा संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आहे. एखादा माणूस चुकू शकतो, पण तो चुकल्यानंतर तो खरेच चुकलाय का? याची खातरजमा करण्याची गरज असते. अजित पवारांनी कधीही याविषयी खंत व्यक्त केली नाही. त्यांनी या सर्व आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिले. त्यांनी उत्तर असे दिले की, ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच त्यांना सहकारी म्हणून स्वीकारले. आम्ही त्यांचा सहकारी म्हणून स्वीकार केला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले. पण बोलायचे तर बोलायचे. ते एखादे काम हाती घेतले तर ते बेधडकपणे करायचे. कारण, त्यांच्या मनात पाप नसायचे. मनात पाप नसेल तर आपण केलेल्या कृतीबद्दल मनात पश्चातापाची भावना नसते. अजित पवार अशा व्यक्तींच्या वर्गवारीत येत होते. त्यांनी अत्यंत अडचणीच्या वेळेला महाराष्ट्राचे अर्थखाते सांभाळले. मला कशाचाही अनुभव नसताना त्यांनी विश्वासू सहकारी म्हणून काम केले. अजित पवार करड्या शिस्तीचे होते. ते 11 वाजता येणार म्हणजे येणार हे ठरलेले होते. आल्यानंतर ते विषय घेऊन यायचे. विषय झाल्यानंतर फार फापटपसारा न करता काम झाले की बरे सीएम साहेब मी निघतो, असे सांगत निरोप घ्यायचे. मंत्रिमंडळ बैठकीतही त्यांचा नेटकेपणा दिसून येत होता. त्यांच्या सर्व गोष्टी काटकोनात असायच्या. हीच सवय शिवसेनाप्रमुखांची होती. माणसाला एकदा शिस्त लागली की त्याचा कारभारही नीटनेटका शिस्तबद्धपणे होतो, अशी आठवण ठाकरे यांनी सांगितली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज आपण सर्वजण दुःखात आहोत. कारण आपला जवळचा माणूस आपल्यातून गेलाय. मी तर माझा चांगला मित्र गमवलाय. पण महाराष्ट्रानेही आपले एक उमदे नेतृत्व गमावले आहे. हे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने ज्यांच्याकडून काही अपेक्षा केल्या होत्या, असे व्यक्तीमत्व आपण गमावलाय. यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि अजित पवार यांचा समावेश आहे. काही कळण्याच्या एका पातळीपर्यंत हे लोक जातात काय? महाराष्ट्र त्यांच्याकडून काही अपेक्षा करतो काय? आणि ते अचानक आपल्यातून जातात काय? हे न समजण्यासारखे आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे नुकसान आणि हा दुःखाचा डोंगर केवळ पवार कुटुंबीयांवर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर कोसळला आहे.

Uddhav Thackeray Targets BJP at Ajit Dada Pawar Condolence Meet

महत्वाच्या बातम्या