विशेष प्रतिनिधी
मुंबई १८ ऑगस्ट: Vivek Agnihotri बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मराठी खाद्यसंस्कृती आणि वरणभाताला ‘गरीबांचं जेवण’ संबोधून नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्याने मराठी जनतेच्या भावना दुखावल्या असून, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने मराठी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. ‘कर्ली टेल्स’ या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीवर टीका करत वरणभाताला ‘गरीबांचं जेवण’ असं संबोधलं. मराठी जेवण साधं, तेल-मसाल्याविना आणि कमी दर्जाचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. या वक्तव्यमुळे मराठी समाजात तीव्र नाराजी पसरली असून, सोशल मीडियावर #MarathiFood आणि #VivekAgnihotri ट्रेंड करत नेटकरी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.
अग्निहोत्री यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी लग्नानंतर त्यांना वरणभात खायला दिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. “तेल नाही, मसाला नाही, हे कसलं गरीबांचं जेवण?” असं त्यांनी उद्गार काढले. पल्लवी जोशी यांनीही मराठी जेवणाच्या साधेपणाला दुजोरा देत त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. मात्र, या टिप्पणीने मराठी खाद्यसंस्कृतीच्या साधेपणाचा आणि सौंदर्याचा अवमान केल्याची भावना मराठी जनतेत निर्माण झाली आहे.
नेटकऱ्यांकडुन खरपुस समाचार…
सोशल मीडियावर मराठी नेटकऱ्यांनी अग्निहोत्रींवर जोरदार हल्ला चढवला आहे. “वरणभात हा मराठी संस्कृतीचा अभिमान आहे. त्याला गरीबांचं जेवण म्हणणं म्हणजे मराठी अस्मितेचा अपमान,” असं एका नेटकऱ्याने लिहिलं. दुसऱ्या युजरने प्रश्न उपस्थित केला, “कोणत्याही खाद्यसंस्कृतीला अशी नावं ठेवणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे का?” मराठी जेवणाचा साधेपणा हा त्याचा आत्मा असून, ते आरोग्यदायी आणि वैविध्यपूर्ण आहे, असा युक्तिवाद अनेकांनी केला. “वरणभात हे केवळ जेवण नाही, तर मराठी माणसाच्या समृद्ध आणि साध्या जीवनशैलीचं प्रतीक आहे,” असं एका ट्विटर युजरने ठामपणे सांगितलं.
हे काही नवे नाही..
विवेक अग्निहोत्री यांचा वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास नवा नाही. यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी भोपाळी लोकांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांनी ‘भोपाळी’ हा शब्द ‘होमोसेक्शुअल’ आणि ‘नवाबी शौक’ यांच्याशी जोडला, ज्यामुळे भोपाळ मध्ये तीव्र नाराजी पसरली होती. यासंदर्भात मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात पत्रकार रोहित पांडे यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच, त्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटही इस्लामविरोधी आणि वास्तवाला धरून नसल्याच्या आरोपांमुळे वादात सापडला होता.
या ताज्या वक्तव्यमुळे मराठी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का बसला आहे. मराठी खाद्यसंस्कृतीच्या साधेपणाला कमी लेखणं हे अग्निहोत्रींचं अज्ञान आहे की जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, हा प्रश्न आता चर्चेत आहे. मात्र, मराठी जनता आपल्या खाद्यसंस्कृतीचा अभिमान बाळगून या टीकेला सोशल मीडियावर सडेतोड प्रत्युत्तर देत आहे.
Netizens are furious over Vivek Agnihotri’s statement on Varan Bhata!
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला