विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत जे काही घडले ते अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातील जनता, माझ्या माता-भगिनी एवढी उफराटी नाही. आपण एवढी सगळी कामे केली, त्यानंतरही ते असे काही करणार नाहीत. त्यामुळे काहीतरी गडबड घोटाळा नक्की झाला आहे. आता हे सर्व घोटाळे एकेक बाहेर येत आहेत, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा निवडणूक घोटाळ्याचा आरोप केला आहे.
शेतकरी क्रांती संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विलीन झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला कुणालाही असे वाटले नव्हते की, असा वेगळा निकाल लागेल. मी प्रामाणिकपणे सांगतो, मला अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. माझ्या काळात नागपूरचे एकमेव अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे येऊन आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली नव्हती. पण मी माझ्या भावनेला जागून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्यापेक्षा त्यांना कर्जमुक्ती दिली.
ते म्हणाले, अनेकजण आपली शिवसेना संपवायला निघालेत. उद्धव ठाकरेंना संपवण्यास निघालेत. पण त्यानंतरही त्यांना एक प्रश्न पडला आहे की, एवढे सगळे करून उद्धव ठाकरे व त्यांची शिवसेना संपत का नाही? त्यांना समजत नाही की, सगळीच माणसे काही पैशांनी विकली जात नाहीत. काही गद्दार पैशांनी विकले जाऊ शकतात. पण निष्ठावंत विकले जाऊ शकत नाहीत. म्हणूनच माझ्यासोबत माझे सगळेच जुने सहकारी आहेत. आपण ज्या लोकांना मोठे केले ते आपल्याला सोडून गेले. पण ज्यांनी त्या लोकांना मोठे केले ते माणसे माझ्यासोबत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हतबल मुख्यमंत्री असल्याची टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी एवढे हतबल मुख्यमंत्री पाहिले नाही. कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही. एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्याचा आणि त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे असा प्रकार सध्या सुरू आहे. आपल्या काळात आपण आरोप झाले की मंत्र्यांचे राजीनामे घेत होतो. पण आता स्थिती वेगळी आहे. आम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा होती. पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली नितीमूल्य समिती कुठे गेली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने राजीनामा घेण्याऐवजी मंत्र्यांना समज दिली. त्यांना सोडून दिले. आता कितीही घोटाळे केले तरी हरकत नाही. धुळ्यात पकडण्यात आलेल्या रोख रकमेचा तपास थंडावला. बॅगा घेऊन बसलेल्या लोकांची काहीही चौकशी झाली नाही.
माणिकराव कोकाटे यांच्या कृषिखात्यावरून झालेल्या उचलबांगडीवर उद्धव ठाकरे म्हणाले, आज तर एक कार्टुन आले आहे. कदाचित आता रमी व तीन पत्तीला आता ऑलिम्पिकमध्ये मागणी होईल. कारण, पहिल्यांदा जो ज्याचा विषय आहे, त्याला ते खाते देण्यात आले आहे. नाहीतर त्यांचे (माणिकराव कोकाटे) कृषिखाते नव्हतेच. ते केवळ शेतकऱ्यांची थट्टा व मस्करी करत होते. पण आता रमी खेळणारा माणूस क्रीडामंत्री झाला. अशा पद्धतीने हे सरकार सुरू आहे. आपल्याला या लोकांच्या भ्रष्टाचाराचा विद्रुप चेहरा लोकांपुढे न्यावा लागेल. याविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आपण राज्यात लवकरच हे आंदोलन छेडणार आहोत. तेव्हा सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
लाडक्या बहिणींमध्ये किती पापी घुसलेत? ते कुणी घुसवले? पैसे कुठे गेले? आजच बातमी आहे की, लाडक्या बहिणींसाठी पैसे वळवण्यात आलेत. थोडक्यात हे सर्वकाही ओढून ताणून सुरू आहे. आत्ता बहिणींची सुद्धा आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष घातले पाहिजे. महायुतीने दाखवलेल्या स्वप्नाला काही लोक भुलले असतील, पण निवडणूक झाल्यानंतर आता त्यांचे खरे रुप समोर येत आहे. आपण कर्जमुक्तीचे आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
What happened in the assembly elections is incomprehensible, Uddhav Thackeray once again doubts the election process
- महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान