विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.Ajit Pawar
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाने काढलेल्या ‘हंबरडा’ मोर्चावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरे गटाच्या वतीने आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढण्यात आला. हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पीक विम्याचे निकष पूर्ववत करणे आणि घरे व पशुधनासाठी मदत निकष शिथिल करून तातडीने मदत देण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली. आता या मोर्चावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.Ajit Pawar
पवार म्हणाले, कोणत्याही आपत्तीच्या वेळी सरकार पाहणी करून, पंचनामे करून माहिती संकलित करते व त्यानुसार मदत करते. मात्र, जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्ष करत असतात. सरकारची मदत तुटपुंजी आहे, अशी टीका करतात, मागणी करणे, टीका करणे विरोधकांचे कामच असते.Ajit Pawar
राज्य सरकारने पूरग्रस्तांना आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पैशाची आणि धान्याची मदत दिली आहे. सरकारने जाहीर केलेल्या साडेतीनशे कोटी रुपयांच्या पॅकेजचे वाटप दिवाळीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मदतीसाठी केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात बदल करता येत नाही. त्यामुळे शेतीचे पंचनामे, रस्ते आणि पुलांचे झालेले नुकसान याची सर्व माहिती घेऊन, त्याचा संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, अजित पवार म्हणाले की, पाटील यांनी नेमके काय वक्तव्य केले हे मला माहिती नाही. परंतु, जर ते बोलले असतील, तर बळीराजाबद्दल असे बोलणे योग्य नाही. मी त्यांची भेट घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देईन.