विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : Harshvardhan Patil : सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत अंतिम प्रभाग रचनाही जाहीर होणार आहे. निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने राजकीय पक्षांनीही आपापली चाचपणी सुरू केली आहे. बऱ्याच कालावधीनंतर महानगरपालिका निवडणुका होत असल्याने राजकीय पक्षांना आपली ताकद नव्याने आजमावावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार यांनी आपल्या ताफ्यातील एका अनुभवी नेत्यावर, हर्षवर्धन पाटील यांच्यावर, शहराची जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादीचा गड आणि भाजपाचा उदय
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. 2002 ते 2017 या 15 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादीने येथे सत्ता गाजवली. मात्र, 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) हा गड भेदला आणि प्रथमच कमळ फुलवले. 2017 नंतर राजकीय परिस्थिती बरीच बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून, पक्षाची ताकद दोन गटांत विभागली गेली आहे. बहुतांश पदाधिकारी आणि नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला पुन्हा विजय मिळवण्यासाठी कसोटीचा सामना करावा लागणार आहे.
शरद पवार गटाची रणनीती
शरद पवार गटाने कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी रणसिंग फुंकले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील तीनही विधानसभा मतदारसंघांत शरद पवार गटाला पराभव स्वीकारावा लागला होता. तरीही, या निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांना एकूण पाच लाख मते मिळाली होती. आता या मतांवरच शरद पवार गटाची मदार असेल. यासाठी पक्षाने अनुभवी नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, हर्षवर्धन पाटील यांना यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, इंदापूर मतदारसंघातून पराभूत झाल्याने त्यांच्यापुढे आता नवे आव्हान आहे.
पक्षासमोरील आव्हाने
हर्षवर्धन पाटील यांना जबाबदारी देऊन शरद पवार गटाला विजयाची आशा असली, तरी पक्षासमोरील आव्हाने मोठी आहेत. अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले अजित गव्हाणे हे आता अजित पवार गटात सामील झाले आहेत. तसेच, चिंचवड शहरातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवलेले राहुल कलाटे हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, शरद पवार गटाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत किती यश मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Harshvardhan Patil : Big Sardar in the fray to win Balekilla again; But the party’s leakages did not stop.
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!