विशेष प्रतिनिधी
पुणे : शहर गुन्हेगारीमुक्त व्हायला हवे. निलेश घायवळ पासून सर्व प्रकरणांमध्ये मी पुणेकरांसाठी बोलत आहे. यावर बोलल्याने उलट माझे राजकीय नुकसान होत आहे. मात्र, त्याची किंमत मोजायला मी तयार आहे, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार आणि आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्यासोबत युतीत असलेल्या भाजपच्या नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत भाष्य करताना त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्याची तक्रार धंगेकर यांचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. रविवारी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हा, महायुतीत पंगा नको असे धंगेकर यांना सांगण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पण तरीही रवींद्र धंगेकर यांनी या विषयावर बोलणारच असे सांगून एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे.
धंगेकर म्हणाले, एकनाथ शिंदे बोलले ती माझीच भाषा होती. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त आणि भयमुक्त केले पाहिजे, असे ते म्हणाले. मी कोणावरही टीका केली नाही, मी फक्त पुण्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना प्रश्न विचारले. मी टीका कालही करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही करत राहणार आहे. माझे आजही म्हणणे तेच आहे. मी कोणावर टीका करत आहे, त्यापेक्षा पुणे हे भयमुक्त झाले पाहिजे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी पबवर टीका केली तेव्हा ते माझ्याविरोधात उभे राहिले होते. पोर्शे कार अपघात प्रकरणात बोलल्यावर ते लोक माझ्याविरोधात गेले, गुन्हेगारही माझ्याविरोधात आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले होते की, रवींद्र धंगेकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, त्यांना मी सांगितलं आहे महायुतीत दंगा नको. गुन्हेगारांना क्षमा नाही, कोणीही असूद्यात त्याला पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन दिले होते.
Even if there is political loss, it will be okay, but I will speak for Punekar, says Ravindra Dhangekar
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना