विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. स्थानिक राजकारणाचा विचार करून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी आणि आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी सर्व पक्ष समीकरणे जुळवत आहेत. पुण्यातही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. भाजपा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट यांच्या वतीने तयारीला सुरुवात झाल्याचे दिसून येते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपाने शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा आणि पुतण्या यांना आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी आमदार संग्राम जगताप यांचा पक्षप्रवेशही भाजपने करून घेतला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही पुण्यात कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र, या सर्वांमध्ये अजित पवार वेगळ्याच वेगाने कार्यरत असल्याचे दिसते. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जनसंवाद आणि राष्ट्रवादी परिवार संमेलनासारखे कार्यक्रम राबवून निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटींनंतर पुण्यातील बहुतांश प्रतिनिधी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यात पवारांची बऱ्यापैकी ताकद कायम आहे. आता अजित पवार गटाने शरद पवार गट आणि भाजप यांना धक्का देत काही पक्षप्रवेश करून घेतले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक आणि शरद पवार गटाचे नेते मुरलीधर निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे आणि शरद पवार गटाच्या नेत्या स्वाती चिटणीस यांचा काल अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश झाला. या पक्षप्रवेशामुळे अजित पवार यांची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. या पक्षप्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार यांना फायदा होईल, असे मानले जाते.
राष्ट्रवादीच्या पुणे येथील कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी बोलताना अजित पवार यांनी पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना जोमाने काम करण्याचा आणि लोकांमध्ये मिसळण्याचा सल्ला दिला. आगामी काळात आणखी पक्षप्रवेश होतील, असेही अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार आणखी कोणत्या नेत्यांना आपल्या गळाला लावतील, हे पाहावे लागेल.
Preparations for local body elections in Pune accelerate; Ajit Pawar group leads
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!