विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर वाचाळपणाचा तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना चुकीचे सल्ले दिल्याचा आराेप विराेधकच नव्हे तर स्वकीयांकडूनही हाेताे. आता उध्दव आणि राज ठाकरे यांच्यात सध्या युतीबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये ठाकरे बंधुंनी राऊत यांना कटाक्षाने दूर ठेवल्याचे चित्र समाेर येत आहे.
मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या आहेत. रविवारी राज ठाकरे यांनी अचानक ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्ताने ५ वेळा एकत्र आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य करतात. यापूर्वी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकार स्थापन होणे यातही संजय राऊतांची भूमिका महत्त्वाची मानली गेली होती. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यातही राऊत यांची मोर्चेबांधणी महत्त्वाची मानली जात होती. परंतु, संजय राऊतांच्या गैरहजेरीत मातोश्रीवर ठाकरे बंधूंनी महत्त्वाची चर्चा उरकून घेतल्याची चर्चा आहे.
गणेशोत्सवात उद्धव ठाकरे दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा उद्धव ‘शिवतीर्थ’वर गेले आणि तिथे युतीसंदर्भात दोन्ही बंधूंची प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसले. त्यानंतर तीन वेळा काही कौटुंबिक आणि सणानिमित्त भेटी झाल्या. संजय राऊत यांच्या घरी रविवारी बारसे झाले. कार्यक्रमाला दोन्ही ठाकरेंनी राऊतांच्या घरी हजेरी लावली.
राऊत रविवारी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच दोन्ही ठाकरेंनी त्यांच्या गैरहजेरीत महत्त्वाची चर्चा आटोपून घेतली. संजय राऊत यांच्या घरी बारशानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. निघताना दोघेही एकत्रितपणे बाहेर पडले. त्यावेळी स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना निरोप दिला. भेटीनंतर राज ठाकरे आपल्या घरी न जाता थेट ‘मातोश्री’वर गेले. ‘मातोश्री’वर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळाला नसला तरी मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या बैठकीत संजय राऊत यांना सहभागी करून घेण्यात आले नाही.
Raut Snubbed Again! Raj and Uddhav Thackeray Avoid Inviting Sanjay Raut to Key Discussion
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा