विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांत बिबट्यांचा संचार वाढला आहे. नागरी वस्त्यांमध्ये हल्ले हाेत आहेत. प्रामुख्याने ऊस बागायती असलेल्या क्षेत्रात बिबटे स्थलांतरीत झाले आहेत. आता वन विभागाच्या वतीने आणखी एक स्थलांतर करण्यात येत असून विदर्भाच्या अभयारण्यातील वाघ सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणून साेडले जाणार आहेत. Tadoba
अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यास पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तीन नर आणि पाच मादी वाघांच्या या नियोजित स्थलांतर प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून ताडोबातील एक तरुण वाघीण सुरक्षितरीत्या सह्याद्रीत पोहोचवण्यात आली आहे. ऑपरेशन तारा या राज्यव्यापी व्याघ्र संवर्धन मोहिमेअंतर्गत झालेल्या या प्रक्रियेला भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र संख्यावाढ आणि नवीन अधिवास विकसित करण्याच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. Tadoba
सुमारे तीन वर्षांची ही वाघीण T20-S-2 म्हणून ओळखली जाते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सर्व सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून पकडण्यात आली. पकडल्यानंतर तिला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि प्रकृती स्थिर ठेवल्यानंतर विशेष तयार करण्यात आलेल्या वन्यजीव वाहतूक वाहनातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अत्यंत दक्षतेने आणि प्रशिक्षित पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली. स्थलांतरादरम्यान वाघिणीच्या आरोग्यावर सतत नजर ठेवण्यात आली होती आणि ताडोबातील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. खोब्रागडे यांनी संपूर्ण आरोग्य तपासणीची जबाबदारी सांभाळली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचल्यावर वाघीणीला सोनारळी येथील विशेष एनक्लोजरमध्ये सॉफ्ट रिलीज पद्धतीने सोडण्यात आले आहे. या पद्धतीअंतर्गत वन्य प्राण्याला मुक्त जंगलात सोडण्यापूर्वी काही काळ नियंत्रित वातावरणात ठेवून त्याला नवीन अधिवासाशी जुळवून घेतले जाते. पुढील काही आठवड्यांत तिच्या हालचाली, आहार, वर्तन आणि आरोग्याचा तपशीलवार अभ्यास केला जाणार आहे. सर्व निरीक्षणे पूर्ण झाल्यानंतरच तिला सह्याद्रीच्या मूळ जंगलात खुल्या अधिवासात सोडले जाईल. अशा प्रकारचे वैज्ञानिक पुनर्स्थापन जंगलातील जैवविविधता टिकविण्यासाठी आणि व्याघ्रांचे स्वतंत्र प्रदेश निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते.
ऑपरेशन तारा, हे महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक दीर्घकालीन आणि समन्वित प्रयत्न आहे. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमध्ये गेल्या काही वर्षांत वाघांची संख्या स्थिरपणे वाढत आहे, तर सह्याद्रीत वाघांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या विस्तीर्ण जंगलात वाघांसाठी योग्य अधिवास निर्माण करण्याचा आणि व्याघ्रसंख्या संतुलित करण्याचा राज्य वन विभागाचा हा प्रयत्न मानला जात आहे. स्थलांतर प्रक्रियेत ताडोबा, सह्याद्री तसेच WII यांच्या तज्ञ पथकांनी घेतलेला समन्वय, काटेकोर नियोजन आणि सावधगिरीमुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी या यशस्वी स्थलांतराबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक टप्पा आहे. सॉफ्ट रिलीजद्वारे वैज्ञानिक पुनर्स्थापना प्रक्रिया प्रभावीपणे सुरू झाली आहे. आमचे पथक या संपूर्ण प्रक्रियेकडे अत्यंत जबाबदारीने पाहत आहे. WII च्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण निरीक्षण सुरू ठेवले जाईल आणि सह्याद्रीला पुन्हा सक्षम, सुरक्षित आणि नैसर्गिक व्याघ्र अधिवास बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या निर्णयामुळे सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Tigers from Tadoba relocated to Sahyadri Ghat, three male and five female tigers
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















