शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत गेलेल्या राजू शेट्टी, महादेव जानकर यांना अटक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: प्रस्तावित अमेरिका-भारत व्यापार कराराला विरोध करण्यासाठी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

राजघाट परिसरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोन्ही नेत्यांना ताब्यात घेतल्याचे आंदोलनाशी संबंधित प्रतिनिधींनी सांगितले. देशभरातील १५४ हून अधिक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी या आंदोलनासाठी किसान घाट परिसरात दाखल झाल्याचा आयोजकांचा दावा आहे.



‘देश बचाओ मोर्चा’च्या माध्यमातून आयोजित या आंदोलनात प्रस्तावित व्यापार करारामुळे भारतीय शेती, दुग्धव्यवसाय, लघुउद्योग आणि स्थानिक बाजारपेठांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. शेतकरी संघटनांनी शेती आणि दुग्ध क्षेत्राला आंतरराष्ट्रीय व्यापार करारातून पूर्णपणे वगळण्याची मागणी केली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील किसान घाट आणि राजघाट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिल्ली वाहतूक पोलिसांनी मध्य दिल्लीतील काही मार्गांवर वाहतूक कोंडी आणि संभाव्य मार्गबदलांबाबत नागरिकांना सतर्क केले होते.

पंजाबमधून दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू बॉर्डरवरही अनेक स्तरांमध्ये बॅरिकेडिंग करण्यात आली असून अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, अमेरिकेतून स्वस्त आणि अनुदानित कृषी उत्पादनांची आयात वाढल्यास भारतीय शेतमालाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारने मात्र तांदूळ, गहू, दुग्धजन्य पदार्थ, कुक्कुटपालन आणि बहुतांश महत्त्वाच्या कृषी उत्पादनांना करारातून संरक्षण देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

Raju Shetti, Mahadev Jankar Detained During Delhi Farmers’ Protest

महत्वाच्या बातम्या