विशेष प्रतिनिधी
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या राजकारणातून एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर येत आहे. पुणे महानगरपालिकेत (PMC) येणाऱ्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडे पिस्तुलांचे प्रमाण वाढल्याचे उघड झाले आहे. वाढती गर्दी आणि त्यासोबत येणारी शस्त्रे पाहता, आता खुद्द महापौरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यांच्या दालनाबाहेर चक्क मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत.
काय आहे नेमका प्रकार?
महापालिकेच्या निवडणुका तब्बल चार वर्षांनंतर पार पडल्या आणि नवीन सभागृह अस्तित्वात आले. यामुळे पालिकेत नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, या गर्दीत एक गंभीर बाब सुरक्षा विभागाच्या निदर्शनास आली. पालिकेत येणारे अनेक जण सोबत ‘परवानाधारक पिस्तूल’ घेऊन थेट आत प्रवेश करत आहेत.
सुरक्षा रक्षकांची तत्परता आणि ‘तो’ प्रसंग!
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या मुख्य सभेदरम्यान एका नगरसेवकाने थेट पिस्तूल घेऊन सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सजग सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. नियमानुसार सभागृहात शस्त्र नेण्यास सक्त मनाई असल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. केवळ नगरसेवकच नव्हे, तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शस्त्रे घेऊन फिरत असल्याने सुरक्षेचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
महापौरांच्या दालनाबाहेर ‘लोखंडी’ बंदोबस्त!
वाढता धोका लक्षात घेऊन पालिकेच्या सुरक्षा विभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. मेटल डिटेक्टर: महापौर मंजूषा नागपुरे यांच्या दालनाबाहेर ‘डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर’ यंत्रणा बसवण्यात आली आहे.आता महापौरांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आणि कार्यकर्त्याची सखोल तपासणी करूनच त्यांना आत सोडले जात आहे.
अतिरिक्त कुमक: या कामासाठी सहा विशेष सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सभागृह सुरक्षा: केवळ महापौरांचे दालनच नव्हे, तर मुख्य सभागृहाच्या दरवाजावरही अशाच प्रकारचे मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
या परिस्थितीवर बोलताना पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर म्हणाले ..
“महापालिकेत येणाऱ्या अनेक माननीयांकडे आणि कार्यकर्त्यांकडे परवानाधारक पिस्तूल असतात. महापालिकेचे नियम माहीत नसल्याने अनेकदा त्यावरून गोंधळ उडतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी आम्ही आता मेटल डिटेक्टर यंत्रणा कार्यान्वित केली आहे.”
लोकशाहीच्या मंदिरात जिथे जनहिताचे प्रश्न सुटायला हवेत, तिथे शस्त्रांची ही ‘हौस’ कशासाठी? असा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत. नियम सर्वांसाठी सारखेच असले तरी, माननीयांच्या या ‘पिस्तूल’ प्रेमामुळे पालिकेला आता छावणीचे स्वरूप आले आहे, हे मात्र नक्की!
Surge of ‘Gun-Toting’ Leaders in Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर