Air India : एअर इंडिया इमारतीत आता शासकीय कार्यालये; १५ ऑगस्टपासून कामकाज सुरू करण्याचे नियोजन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Air India नरिमन पॉइंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आल्यानंतर या वास्तूचे शासकीय प्रशासकीय संकुलात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या इमारतीत विविध शासकीय विभाग तसेच मंत्री कार्यालयांचे स्थलांतर करण्यात येणार असून, त्यापूर्वी इमारतीची सविस्तर संरचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे.Air India

इमारतीबाहेरील एअर इंडियाचा फलक हटवून त्याठिकाणी महाराष्ट्र शासनाचा फलक लावण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी इमारतीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दुरुस्ती, डागडुजी आणि अंतर्गत सुशोभीकरणाची कामे उच्च दर्जाने आणि दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.Air India



भोसले यांनी विद्युत यंत्रणा, फिटिंग्ज आणि इतर तांत्रिक सुविधांसाठी दर्जेदार साहित्याचा वापर करण्यावर भर दिला. तसेच इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे आकर्षक आणि आधुनिक स्वरूप विकसित करण्यासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद आणि तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही दिल्या.

राज्याच्या विविध भागांतून मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितता, सुलभता आणि सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे सांगत सर्व कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपासून या इमारतीत प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एअर इंडिया इमारत खरेदीसाठी राज्य मंत्रिमंडळाने ८ सप्टेंबर २०२३ रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारने ‘एअर इंडिया अॅसेट होल्डिंग कॉर्पोरेशन’कडून ही इमारत १,६०१ कोटी रुपयांना खरेदी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी अदा केल्यानंतर मंगळवारी या वास्तूचा अधिकृत ताबा महाराष्ट्र शासनाकडे आला.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, एअर इंडिया इमारतीचे शासनाकडे झालेले हस्तांतरण हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. गुणवत्तापूर्ण दुरुस्ती, दीर्घकालीन टिकाऊपणा आणि नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य देत या वास्तूचा आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास करण्यात येणार आहे.

Air India Building to House Government Offices; Maharashtra Plans August 15 Launch

महत्वाच्या बातम्या