भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती पाेटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करेल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा पाेटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध हाेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 55 उमेदवारांनी उडी घेतल्याने लढतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.



काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांच्या रूपाने धनगर समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवून जातीय कार्ड खेळल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि आता त्यांनी या रिक्त जागेवरून विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 55 उमेदवार उतरल्याने लढत अत्यंत रंगतदार होणार आहे.

काँग्रेसने या मतदारसंघात आपला स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने पार्थ पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ही काँग्रेसच्या डाऊनफॉल सुरुवात आहे, असे आक्रमक वक्तव्य केले आहे. पार्थ पवार यांच्या या विधानामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

BJP stands by Sunetra Pawar as an elder brother, assures Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या