विशेष प्रतिनिधी
पुणे : नवी पेठ येथील चिन्मय हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अकरा महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, डॉक्टर व नर्स यांच्या कथित निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Chinmay Hospital
डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. राधा संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव तसेच नर्स मनिषा शिंदे व सरिता सुतार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३४ वर्षीय वकील वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे २०२५ रोजी फिर्यादीच्या ११ महिने १८ दिवसांच्या मुलीस मुलीला उलट्यांचा त्रास होत असल्याने तिला चिन्मय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शरीरातील पाणी कमी झाल्याचे सांगून तिला अॅडमिट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर उपचार सुरू करण्यात आले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, बालिकेला ५०० मिली सलाईन वेगाने देण्यात आले. उपचारादरम्यान हार्टबीट मोजणारी यंत्रणा बंद पडली, तरी योग्य पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच डॉक्टरांकडून वेळोवेळी विरोधाभासी सूचना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्री दुसरे सलाईन सुरू असताना बालिकेला पिवळी उलटी झाली, तरीही डॉक्टर वेळेवर उपस्थित राहिले नाहीत. नर्सकडून इंजेक्शन देण्यात आले, मात्र त्यानंतरही स्थिती गंभीर होत गेली.
रात्री सुमारे ११.५० वाजता बालिका प्रतिसाद देत नसल्याचे नर्सच्या लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. काही वेळाने डॉक्टरांनी बालिकेचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मात्र, मृत्यू यापूर्वीच झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, मृत्यूनंतर रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार सलाईन बाटल्या व साहित्य हटवणे, फाईल आणि रजिस्टर लपवणे, नोंदींमध्ये बदल करणे तसेच मृत्यूचे कारण व वेळ चुकीची नमूद केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
तसेच बालिकेची स्थिती गंभीर असतानाही रुग्णालयात आयसीयू सुविधा नसताना तिला दाखल करून घेतल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. डॉक्टर अनुपस्थित असताना नर्सकडून उपचार करण्यात आल्याचा आणि पात्रता नसलेल्या नर्सकडून वैद्यकीय कामे करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
Four doctors, nurse booked for minor girl’s death due to alleged medical negligence at Chinmay Hospital
महत्वाच्या बातम्या