नसरापूर प्रकरण:आरोपीला फाशीच व्हायला हवी, आधीच्या गुन्ह्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करा – मेधा कुलकर्णी

विशेष प्रतिनिधी

पुणे: संबंधित नराधमाने याआधीही दोन वेळा अशाच प्रकारचे कृत्य केले आहे. अशा गुन्हेगाराची आधी सुटका व्हायलाच नको होती. यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये तपास करताना काही हलगर्जीपणा झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

नसरापुरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पीडित कुटुंबाची भेट घेत कुटुंबीयांना धीर दिला. माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, कुटुंबाची एकमेव मागणी आरोपीला फाशीची शिक्षा मिळणे हीच आहे. या संदर्भात प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांशीही या विषयावर संवाद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित पित्याची राजकीय नेत्यांबद्दलची उद्विग्नता योग्यच आहे, कारण अनेकदा नेते केवळ फोटो काढण्यापुरते येतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

नवले ब्रिजवर झालेल्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलकांवर कोणताही ठपका ठेवू नका. काही पोलीस कर्मचारी आंदोलकांवर लाठीचार्ज करताना दिसले आहेत, जे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या.

महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘शक्ती कायद्या’संदर्भात आपण सरकारशी बोलणार असल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अशा गुन्हेगारांवर कठोर वचक बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nasrapur Incident: The Accused Must Be Hanged; Probe the Negligence in Previous Crimes – Medha Kulkarni