पुण्यात १३ शाळा अनधिकृत; पालकांना प्रवेश न घेण्याचे महापालिकेचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

 

पुणे:शहरात शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनधिकृत शाळांचा मोठा प्रकार समोर आला असून, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील तब्बल १३ शाळा कोणतीही वैध प्रशासकीय परवानगी न घेता सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या तपासणीत बीबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव या भागांमध्ये काही शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचे आढळून आले. संबंधित शाळांनी शिक्षण विभागाची आवश्यक मान्यता, नोंदणी किंवा परवानगी न घेता वर्ग सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक वेळा पालक आकर्षक जाहिराती, इंग्रजी माध्यमाचे आमिष किंवा कमी फीच्या नावाखाली अशा शाळांकडे वळतात. मात्र, नंतर शाळेला मान्यता नसल्याचे समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेताना अडचणी निर्माण होतात, तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते.
महापालिकेने अशा शाळांविरोधात कारवाईचा इशारा दिला असून संबंधित संस्थांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाईसह शाळा बंद करण्याची प्रक्रिया देखील राबवली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

कोणत्या शाळा अनधिकृत?

१.आर्यन वर्ल्ड स्कूल,उंड्री
२.ग्लोबल इंग्लिश स्कूल, आंबेगाव पुणे
३. इकरा इस्लामिक स्कूल,कैसरबाग कोंढवा
4. ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री तालुका हवेली पुणे
5. शिबिली लोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, कोंढवा
6. लेगसी हायस्कूल, कोंढवा
7. आर्यन पब्लिक स्कूल, नऱ्हे
8. आकांक्षा अकॅडमी स्कूल, लोहेगाव
9. इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर
10. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा
11. टीम्स तकवा इस्लामिक स्कूल,कोंढवा
12. महात्मा गांधी प्रशाला,येरवडा
13. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश स्कूल, बिबवेवाडी

13 schools in Pune are unauthorized; Municipal Corporation appeals to parents not to admit them

महत्वाच्या बातम्या