शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; “रक्त सांडले तरी चालेल, पण प्रकल्प होऊ देणार नाही” महिलांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील जनआंदोलन आता अधिक तीव्र होत असून मंगळवारी कोल्हापुरात हजारो शेतकरी, महिला आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आमचे रक्त सांडले तरी चालेल, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही,” असा आक्रमक निर्धार महिलांनी व्यक्त करत प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला.
या मोर्चात काँग्रेस नेते सतेज पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच छत्रपती शाहू महाराज सहभागी झाल्याने आंदोलनाला मोठे राजकीय आणि सामाजिक बळ मिळाले. आंदोलनकर्त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या भावना आणि स्थानिक जनतेच्या विरोधाकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी केली. Shaktipeeth Highway

जमीन गेली तर संसार उद्ध्वस्त होईल : महिला

मोर्चात ग्रामीण भागातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. महामार्गासाठी जमीन संपादित झाल्यास हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती महिलांनी व्यक्त केली. शेती हीच आमच्या कुटुंबाचा आधार असून जमीन गेल्यानंतर मुलांचे शिक्षण, विवाह आणि आर्थिक सुरक्षितता धोक्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

“शेती वाचली तरच आमचे भविष्य वाचेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प स्वीकारणार नाही,” असा निर्धार महिलांनी व्यक्त केला.

मोर्चादरम्यान बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना नको असलेला प्रकल्प जबरदस्तीने राबवू नये, असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नागपूर-रत्नागिरी महामार्गासारखे पर्याय उपलब्ध असताना नव्या महामार्गाची आवश्यकता काय, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकल्पामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतील, असा दावा त्यांनी केला.

सांगलीत ड्रोन सर्वेक्षणालाही विरोध

शक्तिपीठ महामार्गाविरोधातील असंतोष आता सांगली जिल्ह्यातही वाढताना दिसत आहे. खानापूर तालुक्यातील विटा परिसरातील नागेवाडी आणि माऊली भाग्यनगर येथे सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला.
यावेळी शेतकरी आणि सर्वेक्षण अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. “आम्हाला महामार्गच नको असताना सर्वेक्षण कशासाठी?” असा सवाल करत शेतकऱ्यांनी ड्रोन मोजणी तात्काळ थांबवण्याची मागणी केली.

Massive Protest Against Shaktipeeth Highway