नाशिकमध्ये बंडखोरी शमली; प्रसाद हिरे यांची माघार, महायुतीसमोरील मोठा अडथळा दूर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी शमवण्यात अखेर यश आले आहे. नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमधील निवडणुकीचा तिढा मोठ्या प्रमाणात सुटला असून महायुतीला दिलासा मिळाला आहे. Prasad Hire

सोमवारी उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसाद हिरे यांची भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हिरे यांनी महायुतीच्या व्यापक हितासाठी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “आमचे दोन्ही उमेदवार माघार घेतील, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे प्रसाद हिरे यांनी आता अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला आहे. नाशिकचा प्रश्न सुटल्याने जळगावमधील परिस्थितीही लवकरच स्पष्ट होईल.”



महाजन यांनी पुढे सांगितले की, नाशिकमधील अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्याशी सध्या फोनवर चर्चा सुरू असून त्यांचीही समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिकमधील बंडखोरी शमली असली तरी जळगावमध्ये महायुतीसमोरील आव्हान अद्याप कायम आहे. भाजपने नंदकिशोर महाजन यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना, शिंदे गटाशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरी केली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले असले तरी त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

तथापि, नाशिकमध्ये प्रसाद हिरे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर जळगावमधील तिढाही लवकरच सुटेल, अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक आणि जळगाव विधान परिषद निवडणुकांचे अंतिम चित्र पुढील काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Mahayuti Defuses Nashik Rebellion as Prasad Hire Withdr aws, Backs Official BJP Candidate

महत्वाच्या बातम्या