विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आज पहाटे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत होते.
अभिजीत दिपके हे नुकतेच अमेरिकेतून भारतात परतले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी ६ जून रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर ते थेट छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील आपल्या निवासस्थानी पोहोचले.
दिपके यांच्या आगमनाची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करत दिपके यांचे स्वागत केले. त्यामुळे परिसरात काही काळ उत्साहाचे आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
कायदो व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाळूज महानगर परिसरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते. दिपके यांच्या निवासस्थानाजवळील परिसरात पोलीसांकडून विशेष नजर ठेवण्यात आली.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनानंतर दिपके पुढे कोणती भूमिका घेणार आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर त्यांची पुढील रणनीती काय असेल, याकडे त्यांच्या समर्थकांसह राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Abhijit Dipke Arrives in Chhatrapati Sambhajinagar After Return from US; Tight Police Security in Place
महत्वाच्या बातम्या