विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड: चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांवर सोमवारी (दि. ८) रात्री करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत आठ ते दहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई सुरू होती. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे ५०० पोलिसांचा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. कारवाई सुरू असताना मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. संबंधित समाजाकडून कारवाईला तीव्र विरोध करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला असता काही नागरिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर परिस्थिती चिघळून जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेही सांगण्यात येत आहे.
दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या काही वाहनांचेही नुकसान झाल्याचे समजते. घटनेनंतर चिखली परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे
Mob turns violent over action against religious structures
महत्वाच्या बातम्या