फुटीच्या चर्चांदरम्यान ठाकरे गटाची लोकसभा अध्यक्षांकडे धाव; पक्षाच्या मान्यतेबाबत ठाम भूमिका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन सादर करत संसदेत “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” हाच एकमेव मान्यताप्राप्त संसदीय पक्ष असल्याची भूमिका ठामपणे मांडली आहे. पक्षातून फुटून जाणाऱ्या किंवा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही खासदारांच्या गटाला स्वतंत्र ओळख, अधिकृत दर्जा, संसदीय सुविधा अथवा विशेषाधिकार देऊ नयेत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलेले असतानाच हे पत्र जारी करण्यात आले. त्यामुळे हे केवळ प्रशासकीय पत्र नसून संभाव्य राजकीय घडामोडींना दिलेले आगाऊ उत्तर मानले जात आहे.



पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, भविष्यात कोणत्याही गटाकडून स्वतंत्र मान्यता किंवा वेगळ्या संसदीय गटाच्या दर्जाची मागणी करण्यात आल्यास त्यावर निर्णय घेण्यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपली बाजू मांडण्याची संपूर्ण संधी दिली जावी.

दहाव्या अनुसूचीचा आधार

पक्षाने संविधानातील दहाव्या अनुसूचीचा, म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्याचा, स्पष्ट उल्लेख करत आवश्यकतेनुसार सर्व घटनात्मक आणि कायदेशीर अधिकारांचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या किंवा वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाचे नेते तथा दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पाठवले आहे.

राजकीय चर्चांना वेग

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महाविकास आघाडीतील समीकरणे आणि पक्षाच्या भविष्यातील राजकीय रणनीतीच्या पार्श्वभूमीवर काही खासदार वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशा परिस्थितीत लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेले हे निवेदन ठाकरे गटाने आपली संसदीय आणि कायदेशीर भूमिका मजबूत करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, हे पत्र संभाव्य पक्षांतर रोखण्याचा प्रयत्न असून, भविष्यात कोणतीही फुट पडल्यास तिच्यावर कायदेशीर आणि संसदीय स्तरावर आक्षेप नोंदवण्यासाठी पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ठाकरे गटातील खासदारांची भूमिका आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Amid Split Buzz, Thackeray Camp Moves Lok Sabha Speaker; Seeks Recognition as Sole Official Shiv Sena Group

महत्वाच्या बातम्या