Omraje : ओमराजे ठरणार हुकूमाचा एक्का, ठाकरे गटाकडून मनधरणी

विशेष प्रतिनिधी

पुणे : Omraje शिवसेना ठाकरे गटातील बंडाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेला प्रचंड महत्व आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांची मनधरणी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे मध्यरात्री अत्यंत गुप्तपणे ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.Omraje

बंडखोर खासदारांपैकी ५ जण सध्या दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अज्ञातवासात असल्याची माहिती असताना, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुण्यात आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा खटल्याचा काल न्यायालयात निकाल लागल्यानंतर ओमराजे पुण्यातील आपल्या निवासस्थानी परतले. त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ओमराजे यांचे बंड थंड करण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरे गटाने मध्यरात्री एक मोठी खेळी खेळली आहे.Omraje



उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओमराजे यांच्यावर जाहीर टीका केली असली, तरी पडद्यामागे मात्र त्यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे मध्यरात्री अत्यंत गुप्तपणे ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले.

ठाकरे गटाची ही रणनीती अत्यंत महत्त्वाची आहे. जर ओमराजे निंबाळकर यांचे बंड शांत करण्यात ठाकरे गटाला यश आले, तर दिल्लीत असलेल्या उर्वरित ५ बंडखोर खासदारांचे गणित बिघडू शकते आणि त्यांचा गट धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच ठाकरे गटाकडून ओमराजेंना थांबवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल ओमदादांच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही. त्यामुळे खचलेल्या निंबाळकर परिवाराची विचारपूस करण्यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही आलो होतो. ओमदादा हे आमच्या पक्षाकडून एकदा आमदार आणि तीनदा खासदार झाले आहेत. आजही ते ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. आमच्यात अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली, मात्र प्रत्येक गोष्ट माध्यमांसमोर सांगण्याची गरज नसते.

वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांच्या या मध्यरात्रीच्या गुप्त भेटीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण साळी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाच्या या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना किरण साळी म्हणाले, “रात्रीच्या अंधारात गाड्या बदलून, कपडे बदलून आणि तोंड झाकून वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आले आहेत. यावरूनच त्यांची हतबलता दिसून येते. एकीकडे त्यांचे प्रवक्ते संजय राऊत जाहीरपणे या खासदारांना गद्दार, खोके आणि अश्लील घाणेरड्या शिव्या देतात; तर दुसरीकडे वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी मध्यरात्री गुपचूप येऊन त्याच खासदारांच्या पाया पडतात! यांची वैचारिक पातळी किती खाली घसरली आहे बघा.”

Omraje emerges as key player as Thackeray faction begins outreach

महत्वाच्या बातम्या