विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tukaram Mundhe अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे बुधवारी विधानसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखाने कौतुक केले. खाद्यपदार्थांमधील भेसळ, गुटखा आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकरणांवर सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे एफडीए प्रथमच राज्यभर चर्चेत आल्याचे मत अनेक आमदारांनी व्यक्त केले. यावेळी मुंढे यांची किमान तीन वर्षे बदली करू नये, अशी आग्रही मागणीही सदस्यांनी केली.Tukaram Mundhe
एफडीएच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करत त्यांच्या कामाला सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. भेसळखोरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.Tukaram Mundhe
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संत तुकाराम आणि संत नरहरी सोनार यांचा उल्लेख करत, “वारकरी संप्रदायातील हे दोघे गुरुबंधू होते. आता आयुक्त तुकाराम मुंढे आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही सहप्रवासी बनून राज्यातील भेसळ पूर्णपणे रोखावी,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंढे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. “भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई केल्यामुळे त्यांना समाजमाध्यमांवरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य सुरक्षा पुरवावी. तसेच पुढील तीन वर्षे त्यांची बदली करू नये,” अशी मागणी आव्हाड यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुंढे यांचे अभिनंदन करत, “खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेमुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यांचे पथक अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे काम करत आहे. विभागाला मंजूर निधी पूर्ण मिळावा यासाठी आम्ही विरोधी पक्षात असूनही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू,” असे सांगितले.
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भेसळीच्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधत, “भेसळयुक्त पदार्थांमुळे लहान मुलांमध्येही गंभीर आजार आणि कर्करोगासारख्या समस्या वाढत आहेत. मुंढे यांच्या धडाडीमुळे हे खाते पहिल्यांदाच प्रभावीपणे काम करताना दिसत आहे. त्यांनी जे केले ते पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी का केले नाही? याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी केली.
आमदार सुनील शेळके यांनी कारवाईनंतरही अनेक भेसळखोर पुन्हा त्याच गुन्ह्यांमध्ये आढळून येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुनरावृत्ती करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि आवश्यकतेनुसार त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट केले.
गेल्या काही आठवड्यांत एफडीएने राज्यभरात गुटखा, बनावट दुग्धजन्य पदार्थ, भेसळयुक्त खाद्यतेल, मिठाई आणि इतर अन्नपदार्थांवर मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या आहेत. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून एफडीएच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
विधानसभेतील चर्चेनंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, राज्यातील अन्नसुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.