फाॅंट लहान, अक्षरे अस्पष्ट म्हणत शाेकप्रस्तावातील चुकीबद्दल विधानसभा अध्यक्षांची दिलगिरी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भाेसले यांच्या शाेकप्रस्तावाच्या वाचनावेळी झालेल्या चुकीबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनात चूक झाली हाेती. त्यामुळे त्यांच्यावर टिकेचा भडीमार हाेत आहे. या चुकीवरून आज दिलगिरी व्यक्त करताना ते म्हणाले, माझा तसा कोणताही हेतू नव्हता. प्रिंट अस्पष्ट होती, फाँट लहान होता. या राज्यात दिवंगत आशाजींबद्दल कोणीही अनादर व्यक्त करू शकत नाही. माझेही मराठीवर प्रेम आहे. झाल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करतो.

अध्यक्षांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, वाचनासाठी त्यांच्या हातात देण्यात आलेली शोकप्रस्तावाची प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये आणि अस्पष्ट होती. त्या माहितीत काही तांत्रिक चुका होत्या, ज्या सुरुवातीला निदर्शनास न आल्याने तशाच वाचल्या गेल्या. गेल्या साडेचार वर्षांपासून आपण सभागृहाचे संपूर्ण कामकाज आणि नियम मराठीतूनच हाताळत आहोत. राज्यातील कोणत्याही सदस्याला किंवा व्यक्तीला मराठी भाषेचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच सार्थ अभिमान आपल्यालाही असल्याचे नार्वेकर यांनी आवर्जून नमूद केले. ‘स्वर्गीय आशाताई भोसले’ यांच्याबद्दल अवमानस्पद बोलण्याचा विचार राज्यातील कोणतीही व्यक्ती करू शकत नाही, आणि विधानसभा अध्यक्ष तर मुळीच तसे करू शकत नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.



केवळ एका तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला असून, या वाचनामुळे सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचे मन दुखावले असेल, तर त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. अध्यक्षांच्या या स्पष्टीकरणानंतर एका सदस्याने हा मुद्दा उचलून धरत, चुकीची आणि अस्पष्ट प्रिंट देऊन अध्यक्षांची व पर्यायाने सभागृहाची प्रतिमा मलीन करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर यथोचित कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शाेकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नार्वेकर यांना चांगलेच सुनावले हाेते. आशाताईंच्या निधनाचा हा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही.

नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली हाेती.

Rahul Narvekar Regrets Error in Obituary Motion

महत्वाच्या बातम्या