विशेष प्रतिनिधी
नाशिक :- महापालिकेच्या वतीने नाशिकच्या खुटवडनगर परिसरात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी एका १७ वर्षीय मुलीचा अचानक चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी (२४ जुन ) रोजी घडल्याचे समोर आले. श्रावणी पाटील असे मृत मुलीचे नाव आहे.या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, लसीकरणाच्या रिॲक्शनमुळे की इतर कुठल्या कारणामुळे हा मृत्यू झाला, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.vaccine
खुटवडनगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिर येथे महापालिकेच्या वतीने नियमित लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत होते.या शिबिरात धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस दिली जात होती.श्रावणी पाटील ही तिच्या वडिलांसोबत सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधक लस घेण्यासाठी तिथे आली होती.लस टोचल्यानंतर काही मिनिटांतच ती जवळच असलेल्या एका मेडिकल दुकानाकडे जात असताना अचानक तिला तीव्र चक्कर आली आणि ती भर रस्त्यावर कोसळली. रस्त्यावर कोसळताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट केले गेले आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि तिच्या वडिलांनी तातडीने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि नागरिकांनकडून मोठी गर्दी करण्यात आली होती.
नागरिकांकडुन सखोल चौकशीची मागणी
लसीकरणानंतर अवघ्या काही मिनिटांतच एका मुलीचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. हा मृत्यू लसीच्या रिॲक्शनमुळे झाला, की रस्त्यावर पडल्याने डोक्याला लागलेल्या अंतर्गत मारामुळे झाला, की यामागे आणखी काही वैद्यकीय कारण आहे? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि अंतिम वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आला आहे.
Shocking incident in Nashik! 17-year-old girl dies tragically immediately after receiving the vaccine.
महत्वाच्या बातम्या