विशेष प्रतिनिधी
नागपूर : मतांचे लांगूलचालन आणि काँग्रेससोबतची अभद्र युती टिकवण्यासाठी प्रभू रामचंद्रांकडे पाठ फिरवणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता उशिरा का होईना चांगली बुद्धी सुचली आहे. त्यांनी हिंदुत्वाचे हे विचार काही दिवस तरी टिकवून ठेवावेत, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. Chandrashekhar Bawankule
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांतील चोरीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी राज्यभर ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले. म्हणाले, “संपूर्ण देश आणि राज्याचा आग्रह असताना उद्धव ठाकरे अयोध्येला गेले नाहीत. काँग्रेस नाराज होईल आणि महाविकास आघाडीची युती बिघडेल, या भीतीने त्यांनी प्रभू रामचंद्रांपासून दूर राहणे पसंत केले. मतांसाठी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनाही बाजूला ठेवले.”
बावनकुळे यांनी आरोप केला की, पक्षातील खासदार, आमदार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते दूर जात असल्याने त्यांचा रोष कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे आता रामरक्षा आंदोलन करत आहेत. “हनुमान चालीसा पठण प्रकरणात खासदार नवनीत राणा यांना १४ दिवस तुरुंगात टाकणाऱ्या ठाकरेंना आता रामाची आठवण झाली आहे. त्यांनी ही भूमिका कायम ठेवावी, अन्यथा ते पुन्हा काँग्रेसच्याच मार्गावर जातील,” असा टोला त्यांनी लगावला.
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार अमित साटम हसल्याचा आरोप आणि त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता बावनकुळे यांनी साटम यांची बाजू घेतली. “अमित साटम हे अत्यंत संवेदनशील आणि प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या गंभीर घटनेवर ते हसतील, असे होऊच शकत नाही. बोलताना विविध विषयांमुळे संदर्भाचा गैरसमज झाला असावा. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.
नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि लक्षद्वीपच्या नावावर सुमारे २,००० ट्रक अवैधरीत्या नोंदणी झाल्याच्या प्रकरणावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “या प्रकाराची माहिती मलाही मिळाली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई सुरू केली आहे. रेती माफिया आणि चोरीच्या वाहनांचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या निधीत घट झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते जयंत पाटील यांनी केलेला आरोपही बावनकुळे यांनी फेटाळून लावला. “जयंत पाटील यांनी आधी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कारभार तपासावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेचा पैसा बँकेत पडून ठेवण्याऐवजी मुंबईच्या विकासकामांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांची टीका हास्यास्पद आहे,” असे बावनकुळे यांनी सांगितले.