विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकांचे प्रश्न सातत्याने मांडत असल्यामुळे पुढील काही दिवसांत विविध शासकीय विभागांकडून स्वतःवर किंवा आपल्या कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सरकारकडून दबाव टाकून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केला. Rohit Pawar
कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून चर्चेचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ८ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील रस्ते आणि ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. भ्रष्टाचारामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसल्याचा आरोप करत त्यांनी अटल सेतूसह मुंबई आणि राज्यातील अनेक महामार्गांवर खड्डे पडल्याचे सांगितले. सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीच्या वापराबाबतही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. राम मंदिरासाठी सुमारे ३,५०० कोटी रुपयांची देणगी जमा झाली असून त्यापैकी १,५०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात कारवाई केवळ कनिष्ठ स्तरावरील व्यक्तींवर न करता संबंधित ट्रस्टच्या विश्वस्तांवर व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
गोविंदगिरी महाराज यांच्या शैक्षणिक संस्थांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील त्यांच्या ३४ शाळांमध्ये बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा आरोप करत या संस्थांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या संस्थांकडे आलेल्या निधीचा स्रोतही तपासावा, असे ते म्हणाले.
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्याचाही रोहित पवार यांनी उल्लेख केला. राम मंदिराशी संबंधित भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्याचे जर ते म्हणत असतील, तर त्यांनी ती सार्वजनिक करावी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. “जनाची नाही तर मनाची लाज असेल, तर संबंधितांचे राजीनामे घ्यावेत आणि ट्रस्टवर सक्षम व स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींना संधी द्यावी,” असेही ते म्हणाले.
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने भूमिका घेणाऱ्या नितेश राणे यांनी राम मंदिर निधीतील कथित गैरव्यवहारावर मौन का बाळगले आहे, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्पर्धा परीक्षांबाबत बोलताना रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. मात्र, तरीही ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयाविरोधात संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रोहित पवार यांनी विविध विषयांवर सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत विरोधक म्हणून लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.