विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांच्यावर होत असलेल्या टीकेला आता त्यांची कन्या किरण अहिर यांनी भावनिक व्हिडीओद्वारे उत्तर दिले आहे. वडिलांवर होत असलेल्या आरोपांचा समाचार घेत त्यांनी राजकारण हे आमच्यासाठी केवळ सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन असल्याचे स्पष्ट केले.
व्हिडीओमध्ये बोलताना किरण अहिर म्हणाल्या, “माझ्या वडिलांनी पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर सातत्याने टीका आणि तिरस्कार केला जात आहे. पक्षाने त्यांना इतकी पदे दिली असताना त्यांनी पक्ष का सोडला, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षाने आम्हाला जे काही दिले त्याचा मी पूर्ण आदर करते. मात्र, आमच्यासाठी राजकारण म्हणजे फक्त राजकारण नसून ती खऱ्या अर्थाने जनसेवा आहे.”
सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. त्यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या पक्षांतरावरून मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली होती.
किरण अहिर यांनी २०१९ मधील राजकीय घडामोडींची आठवण करून देताना सांगितले की, “माझ्या वडिलांनी २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी पक्षासाठी अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले. त्यांच्या त्याच कामाचे फळ आज त्यांना मिळाले आहे.”
पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्यांवर भाष्य करताना त्यांनी म्हटले, “अनेक जण म्हणतात की पक्षाने माझ्या वडिलांना खूप काही दिले. त्या मताचा मी आदर करते.
पण जर त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि अथक परिश्रमाने काम केले नसते, तर त्यांच्यावर इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असत्या का? पदे ही उपकार म्हणून दिली जात नाहीत. ती क्षमता, नेतृत्वगुण, मेहनत आणि कमावलेल्या विश्वासाच्या जोरावर मिळतात.”
किरण अहिर यांनी आवाहन करत म्हटले, “प्रत्येक नातं दोन्ही बाजूंनी जपलं जातं. पक्षाने माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला, तसाच माझ्या वडिलांनीही पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडली. त्यामुळे एखाद्या राजकीय निर्णयावर मत व्यक्त करण्यापूर्वी त्या व्यक्तीचा संपूर्ण राजकीय प्रवास समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.”
My Father Chose Public Service, Not Positions’: Kiran Ahir Defends Sachin Ahir Amid Backlash
महत्वाच्या बातम्या