विशेष प्रतिनिधी
मुंबई: Mankhurd मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मृत्यूंची मालिका सुरूच असून, रविवारी रात्री मानखुर्दमध्ये निवासी इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. गेल्या आठवडाभरात मुंबईत घडलेल्या पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आणखी भर पडल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळी तयारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.Mankhurd
रात्री साडेआठच्या सुमारास जनता नगर, हनुमान मंदिरामागील चाळ क्रमांक ५ येथे भुईमजला अधिक तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत लगतच्या दोन ते तीन झोपड्यांचेही नुकसान झाले असून काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.Mankhurd
मुंबई अग्निशमन दल, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. शताब्दी रुग्णालयात पाच पुरुष आणि एका महिलेस मृत घोषित करण्यात आले, तर एक जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
याच दिवशी वरळी डेअरीजवळ खान अब्दुल गफ्फार खान मार्गावरील तीन मजली रिकामी इमारतही कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दुर्घटनांच्या मालिकेमुळे मुंबईतील जुन्या इमारतींची सुरक्षितता, झाडांची देखभाल आणि महापालिकेच्या पावसाळी तयारीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
झाड कोसळून दुकानातील ज्येष्ठाचा मृत्यू
रविवारी दुपारी कुर्ला पश्चिमेतील कामानी परिसरात बीएमसी हिंदी शाळेजवळ एका दुकानावर झाड कोसळल्याने ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने फौझिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. महापालिकेने त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
आरेमध्ये फांदी कोसळून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
शनिवारी आरे कॉलनीत मित्रांसोबत पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय हसन रझा जहांगीर आलम सय्यद याच्या डोक्यावर झाडाची फांदी कोसळली. त्याला तातडीने बालाजी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे