HSRP : एचएसआरपी नसल्यास ₹1,000 दंड, आरटीओची कारवाई सुरू

विशेष प्रतिनिधी

पुणे: HSRP 30 जूनची मुदत संपल्यानंतर 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे.HSRP

एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर ₹1,000 दंड आकारला जात आहे.

ही मोहीम 1 जुलैपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान एचएसआरपी नसलेले वाहन आढळल्यास संबंधित वाहनचालकावर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जात आहे.HSRP



आरटीओने स्पष्ट केले आहे की, ज्या वाहनधारकांनी 30 जूनपूर्वी एचएसआरपी बसविण्यासाठी नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र, तपासणीवेळी अपॉइंटमेंटचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. अपॉइंटमेंट मिळण्यास विलंब होत असल्यामुळे अशा वाहनधारकांना ही सवलत देण्यात आली आहे.

पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रात 2019 पूर्वी नोंदणीकृत सुमारे 26 लाख वाहने असून, त्यांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य आहे. यापैकी 11 लाख 57 हजार 661 वाहनधारकांनी नवीन नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे.

आतापर्यंत 9 लाख 46 हजार 314 वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सुमारे 2 लाख नोंदणीकृत वाहनांवर अद्याप प्लेट बसविणे बाकी आहे. तसेच मोठ्या संख्येने पात्र वाहनधारकांनी अद्याप नोंदणीही केलेली नाही.

आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना लवकरात लवकर एचएसआरपी बसविण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन करून दंड टाळावा आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी निर्धारित मानकांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरभर संयुक्त तपासणी मोहीम सुरू असून, पुढील काही दिवसांत कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

RTO’s final warning. No HSRP? Be Ready to Pay ₹1,000 Fine

महत्वाच्या बातम्या