विशेष प्रतिनिधी
पुणे : मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मुंबई-पुणे संपर्क तुटणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पारदर्शक चौकशी करून त्यावर झालेल्या खर्चाचे ऑडिट सार्वजनिक करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. Supriya Sule
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “मिसिंग लिंकचे व्हिडिओ सुरुवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) तयार केलेले असावेत असे वाटले. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही. हा मोठा प्रकल्प सुरू झाला तेव्हा वेळ वाचेल म्हणून आम्हीही त्याचे स्वागत केले होते. मात्र एवढा निधी खर्च करूनही प्रत्यक्ष कामात मोठी विसंगती दिसून येत आहे.”
त्या म्हणाल्या, “या प्रकल्पात घोटाळा झाला असे मी म्हणणार नाही. मात्र किती खर्च झाला, कामाचे ऑडिट झाले का, सुरक्षिततेच्या निकषांचे पालन झाले का, या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारने द्यावीत. मुख्यमंत्री यांनी याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी.”
राज्यातील पावसाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याचा विचार करावा. नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. एका पावसात महाराष्ट्र ठप्प झाला आहे. मुंबई-पुणे दरम्यानचे तीनही प्रमुख मार्ग बंद होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
पायाभूत सुविधा विकासावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सरकार स्वतःला ‘इन्फ्रास्ट्रक्चर सरकार’ म्हणवते. मात्र विकासकामांमध्ये सुरक्षितता आणि पर्यावरणाचा विचार नसेल, तर अशा प्रकल्पांचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी केला.
पुण्यात झाडे कोसळण्याच्या घटनांचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या, नियोजन केवळ पायाभूत सुविधा आणि कंत्राटदारांसाठी आहे का? नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार कोण करणार? असेही त्यांनी विचारले.
राजकीय विषयांवर बोलताना विरोधी पक्षातील नेत्यांवर होणाऱ्या कारवायांवरही त्यांनी टीका केली. “विरोधी पक्षात असले की तपास यंत्रणा सक्रिय होतात आणि सत्तेत गेल्यावर सर्व काही माफ होते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटी चोरीच्या प्रकरणावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “राम मंदिर आणि उज्जैन ही आमच्या श्रद्धेची ठिकाणे आहेत. तेथे भ्रष्टाचार किंवा चोरीच्या घटना घडणे दुर्दैवी आहे. राम मंदिरासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या भावना यामुळे दुखावल्या आहेत. अशा प्रकारांना आम्ही समर्थन देणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत केलेल्या कथित वक्तव्यावर विचारले असता, सतेज पाटील यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. मात्र अशा कोणत्याही चर्चेची माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही, असे सुळे यांनी स्पष्ट केले.