विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे आजचे कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
विधानभवनात उपस्थित असलेल्या सदस्यांची सुरक्षितता, कर्मचारी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. यामुळे आज नियोजित प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी सूचना तसेच इतर विधायी कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे.
मुंबईत सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे आणि प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे (Work From Home) निर्देशित केले आहे.
तसेच, शासकीय/ निमशासकीय (अत्यावश्यक सेवा वगळून) कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Mumbai Assembly Adjourned for the Day Amid Heavy Rain
महत्वाच्या बातम्या
- लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यानं मारली रेल्वेमधून उडी; कारण अस्पष्ट
- बाथरुमच्या फरशीखाली गाडला मृतदेह ; पत्नीनेच केला पतीचा खून
- गर्भपात करण्यासाठी पतीकडून विवाहितेचा छळ, फुरसुंगीतील घटना
- पुण्यात मध्यरात्री गोळीबार ! जमिनीच्या वादातून शिवसेना जिल्हाध्यक्षाचा राडा