विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आणीबाणीला भारताच्या लोकशाही इतिहासातील “सर्वात काळा अध्याय” होता. त्या काळात संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली अली असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला आहे.
२५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला बुधवारी ५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सलग पोस्ट करत काँग्रेसच्या त्या काळातील कारभारावर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले, “कोणताही भारतीय संविधानाचा अपमान, नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेणे, पत्रकारितेचे गळचेपी करणे आणि हजारो राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य जनतेला तुरुंगात टाकल्याची घटना कधीही विसरणार नाही. केवळ सत्तेच्या लालसेपोटी त्या वेळच्या काँग्रेस सरकारने लोकशाहीलाच तुरुंगात टाकले होते. PM Modi
आणीबाणी काळात पारित करण्यात आलेल्या ४२व्या घटनादुरुस्ती विधेयकावर (Constitution 42nd Amendment) जोरदार टीका करताना पंतप्रधान म्हणाले, ही दुरुस्ती म्हणजे काँग्रेसच्या “षडयंत्रांचे मूर्त स्वरूप” म्हणता येईल. घटनात्मक व्यवस्थेच्या मूळ तत्वाशी छेडछाड करणारी ही दुरुस्ती होती. १९७६ मध्ये लागू करण्यात आलेली ही दुरुस्ती नंतर जनता पक्ष सरकारने १९७७ व १९७८ मध्ये ४३वी व ४४वी दुरुस्ती करून मागे घेतली होती.
पंतप्रधान म्हणाले, आणीबाणी काळात गरीब, वंचित आणि शोषित वर्गावर अन्याय झाला. त्यांचा आत्मसन्मान पायदळी तुडवण्यात आला. काँग्रेस सरकारने घटनात्मक सत्तेचा गैरवापर करून सत्तेची मक्तेदारी दिली.
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, एनडीए सरकार घटनात्मक मूल्यांच्या बळकटीसाठी कटिबद्ध आहे. आम्ही ‘विकसित भारत’ साकार करण्याच्या दिशेने एकत्रितपणे वाटचाल करत आहोत. संविधानाने दिलेल्या मूल्यांची आम्ही जपणूक करू. देशातील गरीब, वंचित, शोषित घटकांच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करू.
आणीबाणीच्या काळात अनेक विचारधारेतील, विविध भागांतील लोकांनी काँग्रेसच्या दडपशाहीविरुद्ध एकत्र येत देशाच्या लोकशाही रचनेचे संरक्षण केले. याच एकजुटीच्या लढ्यामुळे काँग्रेस सरकारला निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. त्यांचा मोठा पराभव झाला, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मागील वर्षीपासून २५ जून या दिवसाला ‘संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने ‘आंतरराष्ट्रीय अशांती’चा दाखला देत आणीबाणी लागू केली होती. ती २१ मार्च १९७७ पर्यंत लागू होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता आणि जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले होते. PM Modi