विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्याच्या राजकीय वातावरणात सुरू असलेल्या पक्षविलीनीकरण आणि पक्षफोडीच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र टीका केली. सध्या राजकारण करण्याची नव्हे, तर देश वाचविण्याची वेळ असल्याचे सांगत त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारासारख्या गंभीर प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
“आपापसात तू-तू, मै-मै करून घरफोडा आणि पक्ष फोडा, असे उद्योग आम्ही कधी केले नाहीत आणि भविष्यातही करणार नाही,” असे सांगून सुळे म्हणाल्या, देशातील आर्थिक परिस्थिती चिंताजनक असून, त्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी.
नीट (NEET) परीक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता करण्याऐवजी राजकीय वादांमध्ये वेळ घालवला जात आहे. संकटकाळात जनतेला आधार देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.
राजकीय भेटीगाठींच्या चर्चांवर बोलताना सुळे म्हणाल्या की, विविध कामांसाठी वेगवेगळ्या पक्षांच्या मंत्र्यांना भेटणे ही सामान्य बाब आहे. “मी स्वतः दर आठवड्याला अनेक मंत्र्यांना कामासाठी भेटते. काल विनोद तावडे यांची भेट घेतली, ती देखील कामासाठीच होती. अशा भेटींना राजकीय रंग देणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, त्यांच्या पक्षातील कोणत्याही आमदार किंवा खासदारांशी इतर पक्षांकडून संपर्क साधला गेल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या उपोषणाबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, त्यांनी सुरुवातीपासून रोहित पवार यांना उपोषण करू नये, अशी विनंती केली होती. मात्र, शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीमुळे त्यांनी हा लढा उभारला असून त्याचा अभिमान वाटतो. रोहित पवार यांचे आंदोलन हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यामुळे मला मार्गदर्शन किंवा सूचना करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.
Supriya Sule targets ruling dispensation
महत्वाच्या बातम्या