विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tukaram Mundhe सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्तपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी राज्यभरात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात राज्यभरातून कोट्यावधीचा साठा जप्त केला आहे. यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.Tukaram Mundhe
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क्सविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 म्हणजेच मकोका लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.Tukaram Mundhe
तुकाराम मुंढे म्हणाले की, भारताच्या संविधानाच्या कलम 47 नुसार सार्वजनिक आरोग्य सुधारण्याची आणि आरोग्यास अपायकारक पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध करण्याची जबाबदारी राज्यावर आहे. त्यामुळे गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला आणि अशा प्रकारचे प्रतिबंधित पदार्थ हे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 च्या कलम 30(2) (अ) अंतर्गत राज्यात अशा पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. तथापि, प्रतिबंध असूनही काही ठिकाणी या पदार्थांचा अवैध व्यापार पद्धतशीर, संघटित आणि आर्थिक फायद्यासाठी होत असल्याचे अंमलबजावणी यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे, तर उत्पादक, पुरवठादार, वित्तपुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते, उप-विक्रेते आणि इतर सहायक घटक यांचा समन्वयित सहभाग असतो. अनेक वेळा बनावट कागदपत्रे, बनावट चलने, डमी कंपन्या, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे, आंतरराज्य पुरवठा साखळी, तसेच वाहतूक व वितरणासाठी विविध मार्गांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा कारवाऱ्या केवळ अन्नसुरक्षा उल्लंघनापुरत्या मर्यादित न ठेवता, पात्र प्रकरणांत संघटित गुन्हेगारीच्या दृष्टीने तपासल्या जाणे अपेक्षित आहे.
तुकाराम मुंढे म्हणाले की, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत असुरक्षित अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. सदर अधिनियमाच्या कलम 59 अंतर्गत अशा गुन्ह्यांसाठी कारावासाची तरतूद आहे. कलम 64 अंतर्गत पुनरावृत्ती झाल्यास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. तसेच कलमे 38 व 41 नुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणी, शोध व जप्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. कलम 42 अंतर्गत अभियोजन सुरू करण्याची प्रक्रिया नमूद आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 अंतर्गत सतत चालणारी बेकायदेशीर कृती संघटित गुन्हा आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेट याबाबत स्पष्ट तरतुदी आहेत. जर एखादा गुन्हा दखलपात्र असून तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र असेल, मागील दहा वर्षांत एकापेक्षा अधिक आरोपपत्रे दाखल झालेली असतील आणि न्यायालयाने त्यांची दखल घेतलेली असेल, तसेच दोन किंवा अधिक व्यक्ती आर्थिक लाभासाठी समन्वयाने कार्यरत असतील, तर अशा प्रकरणात मकोका लागू करण्याची पात्रता तपासून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
तुकाराम मुंढे म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला किंवा इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण किंवा विक्री होत असल्यास तत्काळ स्थानिक अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा स्थानिक पोलीस यांना माहिती द्यावी. कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देणे हा आमचा उद्देश नाही, मात्र सार्वजनिक आरोग्यास हानी पोहोचवून संघटित पद्धतीने प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि नेटवर्क्सविरुद्ध कठोर, पुराव्यांवर आधारित आणि कायदेशीरदृष्ट्या कठोर कारवाई केली जाईल. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा अवैध व्यापार हा केवळ अन्नसुरक्षा उल्लंघन नसून, यापुढे तो सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर संघटित गुन्हा म्हणून हाताळला जाईल, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
MCOCA to be invoked against Gutkha mafias; strict action against those endangering public health: Tukaram Mundhe’s warning
महत्वाच्या बातम्या