हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर बुलडोझर; सहा अवैध केंद्रे जमीनदोस्त

विशेष प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी मोठी धडक कारवाई करत सहा अवैध दारू विक्री केंद्रे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि एमआयडीसी प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. Bulldozer

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिल्यानंतर विशेष मोहीम राबविण्यात आली.



पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी कारवाईचे नेतृत्व केले.

हातभट्टी दारू विक्रीसाठी उभारण्यात आलेली अनेक ठिकाणे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाशी समन्वय साधून अवैध बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी संयुक्त पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सर्व अड्डे कायमचे हटविले.

दुरेश रमेश राठोड, लखन जडजा शिंदे (सिग्मा चौक, महाळुंगे), पुष्पादेवी शांतीलाल जाट (निघोजे), लखन हाजुरीया ठाकूर (कुरुळी), उदय अशोक कलाल (तळवडे रोड) आणि सुश्मिता बंडू हितेज (सुभाषवाडी, निघोजे) यांच्या अवैध दारू विक्री केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली.

शहरातील अवैध हातभट्टी दारू व्यवसाय, गुन्हेगारी आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Bulldozer crackdown on illicit liquor dens; six illegal brewing hubs razed

महत्वाच्या बातम्या