भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकरांवर ठोंबरे पाटील यांची टीका; सहआरोपी करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. खरात प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंचा दाखला देत ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर खरातला संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. Rupali Chakankar

रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर खरात आणि रुपाली चाकणकर यांचे पाद्यपूजनाचे व्हिडीओ समोर आले. तसेच खरातविरोधातील तक्रारी स्वीकारू नयेत, असे पोलिसांना सांगण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, अशी टीका ठोंबरे यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी दावा केला की, देवाच्या नावाखाली महिलांना भीती दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. अशा वेळी महिलांच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी उभे राहणे अपेक्षित असलेल्या महिला आयोगाने प्रभावी भूमिका बजावली नाही. त्यामुळे या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.



ठोंबरे यांनी आणखी आरोप करताना म्हटले की, अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संबंधांची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक महिलांवर देवाच्या नावाखाली अन्याय आणि अत्याचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्याऐवजी त्या काळात संबंधित यंत्रणा निष्क्रिय राहिल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्यावर आर्थिक संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्या अनुषंगाने चौकशीही करण्यात आली होती. मात्र, चाकणकर यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडीओद्वारे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशोक खरात याच्याशी आपला कोणताही संबंध नसून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ठोंबरे पाटील यांच्या ताज्या आरोपांनंतर आता रुपाली चाकणकर यांची यावर काय भूमिका असेल आणि त्या या आरोपांना कशा प्रकारे उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Rupali Thombre Patil demands action against Rupali Chakankar in Ashok Kharat case

महत्वाच्या बातम्या