शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा देशभर आंदाेलन, अभिजित दीपके यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

पुणे : लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्ये अद्याप जबाबदारी निश्चित झालेली दिसत नाही. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

पुण्यातील पत्रकार भवन येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिपके म्हणाले, परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि स्पर्धा परीक्षार्थींचे भविष्य धोक्यात आले आहे. यासाठी संबंधित यंत्रणांसह केंद्रीय शिक्षण मंत्रालयालाही जबाबदार धरले पाहिजे. ६ जून रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला असून आता ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मोहिमेचा दुसरा टप्पा असेल. सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशभरात व्यापक जनआंदोलन उभारले जाईल



परीक्षा आणि विविध भरती प्रक्रियांमध्ये सातत्याने वाद निर्माण होत आहेत. पेपरफुटी, निकालांतील त्रुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर आणि भविष्य धोक्यात आले असून त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याकडून चूक होते, तेव्हा त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्ये अद्याप जबाबदारी निश्चित झालेली दिसत नाही. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी दिपके यांनी केली.

एक व्यक्तीचा आवाज दाबता येऊ शकतो, पण लाखो लोकांचा आवाज दाबणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ही लढाई आहे. पुण्यातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल. पुण्यातील आंदोलनानंतर लखनौ, जयपूर, अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधण्यासाठी मोहिमेचा विस्तार केला जाणार आहे.

Education Minister should resign or there will be protests across the country, Abhijit Deepke warns

महत्वाच्या बातम्या