विशेष प्रतिनिधी
अमरावती : काॅंग्रेसचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी मॅनेज हाेण्यासाठी १५ ते २० काेटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आराेप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख हे सध्या नागपूरमधील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यावर बोलताना यशोमती ठाकूर यांनी गंभीर सवाल उपस्थित केले.
“हर्षजीत देशमुख हे आयसीयूमध्ये दाखल असतानाही तिथून माध्यमांशी सहज संवाद साधत आहेत. जर त्यांची तब्येत इतकी खालावली आहे तर ते बोलू कसे शकतात? या संपूर्ण प्रकाराबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित होत आहेत. निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर काँग्रेस उमेदवाराने एकप्रकारे माघार घेतल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यामागे खूप मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ झाल्याचा आरोप करत ठाकूर म्हणाल्या, कोट्यवधी रुपयांची रोकड आणि एवढी मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असताना प्रशासनाने आणि गृह विभागाने काय कारवाई केली?” दरम्यान, आता या प्रकरणावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय असेल यावर बोलताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या संदर्भात जे काही निर्णय घेतील आणि जे निर्देश देतील, त्यानुसारच पक्षाची पुढील रणनीती आणि भूमिका ठरवली जाईल. काँग्रेसच्या उमेदवारानेच अशा प्रकारे संशयास्पद माघार घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीत नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Yashomati Thakur’s candidate Harshjit Deshmukh accused of taking Rs 15 to 20 crores for management
महत्वाच्या बातम्या