Meenakshi Natarajan : भाजपच्या आक्षेपानंतर मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभा अर्ज फेटाळला; काँग्रेसचा निवडणूक आयोगाबाहेर ठिय्या

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Meenakshi Natarajan  मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यसभा निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे.Meenakshi Natarajan

भाजपचे प्रदेश महामंत्री राहुल कोठारी यांनी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेत, हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका खासगी फौजदारी तक्रारीत त्यांचे नाव आरोपी क्रमांक चार म्हणून नमूद असल्याचा दावा केला. ही माहिती उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेली नसल्याचे भाजपचे म्हणणे होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी या आक्षेपाची दखल घेत नटराजन यांचा अर्ज फेटाळल्याचे सांगितले जात आहे.Meenakshi Natarajan

मध्य प्रदेशातील तीन राज्यसभा जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. विधानसभा संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला एक जागा सहज मिळण्याची शक्यता होती. मात्र, नटराजन यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपच्या उमेदवाराचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.Meenakshi Natarajan



दरम्यान, काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळून लावत हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी स्पष्ट केले की, मीनाक्षी नटराजन यांच्याविरोधात कोणताही अधिकृत फौजदारी गुन्हा नोंदवलेला नाही. तेलंगणातील प्रकरण हे केवळ न्यायालयीन नोटीसशी संबंधित असून त्याचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्याची कायदेशीर आवश्यकता नव्हती, असा दावा काँग्रेसने केला.

या निर्णयाविरोधात काँग्रेसने दिल्लीत आक्रमक भूमिका घेतली. मंगळवारी रात्री काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली जयराम रमेश, सचिन पायलट आणि अन्य वरिष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचले. मात्र, आयोगाच्या कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याने नेत्यांनी प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

काही काळ आयोगाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. काँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली. अखेर सुमारे तासाभरानंतर काँग्रेसच्या प्रतिनिधींना आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यांनी आपली तक्रार औपचारिकपणे नोंदवली.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या या वादामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, काँग्रेस या निर्णयाविरोधात पुढील कायदेशीर पर्यायांचाही विचार करत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

Meenakshi Natarajan’s Rajya Sabha nomination rejected, Congress stages protest

महत्वाच्या बातम्या